Nagpur Purushottam Puttewar Murder Case: नागपूर येथील पुरुषोत्तम पट्टेवार या वृद्ध व्यक्तिची हत्या त्याच्या सुनेने केली असल्याचे उघड झाले आहे. संपत्ती आणि काळ्या जादुतून ही हत्या करण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे. दरम्यान, या प्रकरणी नवी अपडेट पुढे आली आहे. या हत्ये प्रकरणात गडचिरोलीच्या देसाईगंज येथील एका काँग्रेस नेत्याचा हात असल्याचे पुढे येत आहे. या नेत्याला अटक होण्याची शक्यता आहे. संपत्तीसाठी व काळ्या जादूच्या संशयातून गडचिरोली नगर रचना विभागाची सहायक संचालक अर्चना पुट्टेवार व त्यांचा भाऊ एमएसएमईचा संचालक प्रशांत पार्लेवार यांनी सुपारी देऊन पुरुषोत्तम पट्टेवार यांची हत्या केली होती. हीट अँड रनचे प्रकरण दाखवून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न देखील केला जात होता. मात्र, आता या प्रकरणी एका नेत्याचे नाव पुढे आल्याने खळबळ उडाली आहे.
नागपुरातील श्रीमंत व्यक्ति असलेले पुरुषोत्तम पुट्टेवार हे २२ मे रोजी मुलीच्या घरी पायी जात असताना मानेवाडा चौकाजवळ एका भरधाव कारने त्यांना धडक दिली होती. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद देखील करण्यात आली होती. मात्र, पोलिस तपासात हा खून असल्याचे निष्पन्न झाले. त्यांची हत्या क्लास वन अधिकारी असलेल्या अर्चना पुट्टेवार यांनी केल्याचे उघड झाले. या प्रकरणी अर्चना पुट्टेवार, आरोपी प्रशांत पार्लेवार, सचिन धार्मिक, सार्थक बागडे, नीरज नीमजे आणि पायल नागेश्वर या पाचही आरोपींना १५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अर्चनाने तिच्या सासऱ्यांची हत्या संपत्तीच्या वादातून तसेच काळ्या जादूच्या संशयातून केल्याचे तपसातून उघड झाले आहे. पुरूषोत्तम पुट्टेवार हे धार्मिक वृत्तीचे असून ते पूजा अर्चा करायचे. ते जादूटोणाही करतात असा अर्चनाला संशय होता. त्यांच्यामुळेच आपल्या माहेरच्या कुटुंबातल्या काही जणांचा मृत्यू झाला असून अर्चनाचा मोठा भाऊ प्रवीण पार्लेवर याचा अपघाती मृत्यू झाला होता. तर बहिणीचा देखील मुंबईमध्ये असताना जळून मृत्यू झाला होता. बहिण-भावाचा हा मृत्यू काळ्या जादूने झाला, असा संशय सून अर्चना पट्टेवारला होता. त्यातून त्यांनी सासऱ्याची सुपारी देऊन हत्या केली.
नागपूरच्या पुरुषोत्तम पट्टेवार हत्याकांडात गडचिरोलीच्या देसाईगंज येथील एका काँग्रेस नेत्याचा सहभाग असल्याचे तपासात पुढे आले आहे. गडचिरोली नगर रचना विभागाच्या सहायक संचालक अर्चना पुट्टेवार यांच्या कडून या काँग्रेस नेत्याला गडचिरोलीमध्ये कोळसा पट्टा हवा होता. तर त अर्चना पुट्टेवार यांना देखील प्रमोशन व बदली हवी होती. तसेच सासऱ्याचा काटा देखील त्यांना काढायचा होता. यासाठी त्यांनी या नेत्याची मदत घेतल्याचे तपसात उघड झाले आहे.
अजनी पोलिसांनी तडकाफडकी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुरुषोत्तम त्यांच्या कुटुंबात पत्नी शकुंतला, मुलगा डॉ. मनीष, सून अर्चना व मुलगी योगिता आहे. सुक्ष्म-लघू व मध्यम उद्योग विभागाचे संचालक प्रशांत पार्लेवार याचा मोठा भाऊ प्रवीणची योगिता ही पत्नी असून तिने पार्लेवारच्या संपत्तीतील वाटा मिळावा म्हणून न्यायालयीन लढा सुरु केला होता.
आरोपी नीरज निमजे हा भुरत चोर आहे. तो कुणालाही पार्टी देत नव्हता. तसेच अनेकांना उधारी देखील मागायचा. दरम्यान, अचानक त्याने पैसे उडवण्यास तसेच मित्रांना मोठ्या ब्रॅंडची दारू पाजण्यास सुरुवात केली. यातून त्याच्या काही मित्रांना संशय बळावला. याची माहिती खबऱ्यांमार्फत पोलिसांना मिळाली. त्यांनी निरजच्या अवतीभवती खबरी पेरले. यातून त्याच्याकडे एका अपघात प्रकरणी भरपूर पैसे आल्याचे पोलिसांना कळले. यानंतर त्याला पोलिसांनी उचलले. तसेच त्याची चौकशी केली असता या खुनाचे बिंग फुटले.