नागपूरच्या अंबाझरी तलावात बुडून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. वाढदिवशीच मुलाचा मृत्यू झाल्याने कुटूंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घरीवाढदिवस साजरा केल्यानंतर मित्रांना पार्टी देण्यासाठी अंबाझरी तलावावर गलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना पहाटे तीन वाजता पंपहाऊसवर घडली. ही दुर्दैवी घटना मंगळवारी घडली.
पुलकित राज शहदादपुरी (वय १६) असे मृत मुलाचे नाव आहे. तो अकरावीच्या वर्गात शिकत होता. जरीपटक्यातील एका महाविद्यालयात तो शिकत होता. वाढदिवसाच्या रात्री तो व त्याचा एक मित्र तालावाकाठी पब्जी खेळत होते. दरम्यान,पब्जी खेळण्यात मग्न असलेल्या त्या युवकाचा पाय घसरला आणि पाण्यात पडला. काही मिनिटांतच त्याचा बुडून मृत्यू झाला.
पुलकितचा ११ जून रोजी वाढदिवस होता. वाढदिवशी तो खूपच खूश होता. त्याने सकाळीच नवीन कपडे खरेदी केले होते. कुटूंबीयांसमवेत केक कापल्यानंतर त्यांने मित्रांसोबत वाढदिवसांच्या पार्टीचे आयोजन केले. त्याने कुटुंबीयांसह वाढदिवस साजरा करत मित्रांनाही घरी बोलाविले. रात्री जेवण झाल्यानंतर उशिरापर्यंत तो घरीच होता. आई-वडील व घरातील अन्य सदस्य झोपल्यानंतर तो मित्राला पार्टी देण्यासाठी घराबाहेर पडला. मित्र ऋषी खेमानी (१७) याच्यासोबत जरीपटक्यात गेला.
पहाटेच्या सुमारास ते दोघे शंकर नगरात गेले. मित्राला पार्टी देण्यासाठी ते दुकान शोधत होते. मात्र इतक्या पहाटे एकही दुकान उघडे नव्हते. त्यानंतर वेळ घालविण्यासाठी दोघेही अंबाझरी तलाव येथील पंप हाऊसजवळ गेले. दोघेही मोबाईलवर पब्जी गेम खेळत बसले. पहाटे तीन वाजता नाश्त्याचे दुकान उघडल्याचे लक्षात आल्याने दोघेही तेथून उठले.
ऋषीने मोबाईलच्या उजेडात तलावाजवळील खड्डा पार केला. त्याच्या मागे पुलकित होता. मात्र, पुलकित मोबाईलवर पब्जी खेळण्यात व्यस्त होता. त्याला खड्डा दिसलाच नाही. तो १५ फूट खड्ड्यात पडला. ऋषीला आवाज येताच त्याने मागे वळून बघितले असता पुलकित दिसला नाही. त्याने आरडाओरड करत लोकांना बोलावण्याचा प्रयत्न केला. मात्र पहाटेच्या वेळी कोणीच नसल्याचे त्याला मदत मिळू शकली नाही. कुटुंबीय तसेच पोलिसांना माहिती दिली. अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. अग्निशमन जवानांच्या मदतीने पुलकितचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनानंतर पार्थिव कुटुंबीयांना सोपवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
मुलाचा वाढदिवस साजरा करणाऱ्या आईवडिलांवर पुढच्या काही तासातच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. पुलकितला नुकताच महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. कॉलेजला जाण्यासाठी त्याला बाईक भेट देण्याचे ठरलं होतं. मात्र त्याआधीच त्यानेजगाचा निरोप घेतला.
संबंधित बातम्या