नाशिकमध्ये मुलाच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली असतानाच आता नागपुरातूनही तशीच घटना घडली आहे. नागपुरात लग्नाच्या वाढदिवशी पती-पत्नीने लग्नाच्या ड्रेसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. याआधी सोशल मीडियावर व्हिडिओ मेसेज स्टेटसला ठेऊन कुटूंबीयांना मेसेज दिला आहे. यामध्ये अंत्यविधीच्या खर्चाचाही उल्लेख आहे.
आर्थिक परिस्थितीमुळे दाम्पत्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. नागपूरच्या मार्टीननगरात ही घटना घडली. महिलने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ बनवून व्हॉट्सॲप स्टेट्सवर ठेवला. तसेच एक नोट देखील लिहिली आहे. या संपूर्ण घटनेने नागपुरात खळबळ उडाली आहे.
पती जारील ऊर्फ टोनी ऑस्कर मॉनक्रिप (वय ५४) आणि पत्नी ॲनी जारील मॉनक्रिप (वय ४५) असे आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी ॲनी मॉनक्रिप यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला. या दोघांनी अंत्यविधीसाठी घरात ७५ हजार रुपये ठेवले असल्याचं सुद्धा चिठ्ठीत नमूद करत कुटूंबीयांची माफी मागितली आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवले आहेत. पोलिसांनी सांगितले की, नागपूरच्या मार्टिननगरमध्ये पती-पत्नीने आत्महत्या केल्याची सूचना मिळाल्यानंतर आम्ही तत्काळ घटनास्थळी पोहोचलो. पती-पत्नी लग्नाच्या जोड्यात होती. या दोघांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती. त्यांनी स्टेटसवरही व्हिडिओ पोस्ट केला होता. महिलेचा पती चार-पाच वर्षांपासून बेरोजगार होते. त्यांना मुलबाळ नव्हतं. ते शेफ होते. गेल्या काही दिवसांपासून दोघे आर्थिक परिस्थितीने तणावात होते.
६ जानेवारी रोजी जेरील मॉनक्रिप आणि एनी मॉनक्रिप यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. सेलिब्रेशननंतर दोघांनी लग्नाच्या पेहरावातच जीवन संपवलं.
जेरील मॉनक्रिप हे काही वर्षांपूर्वी शेफचं काम करत होते तर त्यांची पत्नी घरकाम करायची. सुसाईड नोटसह पोलिसांना स्टॅम्प पेपर आणि घरात ७५ हजार रुपये सापडले आहेत. हे पैसे अंत्यविधीसाठी वापरण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. राहते घर कुणाला द्यावे, याची सुद्धा नोंद त्यांनी स्टॅम्प पेपरवर केली आहे.
संबंधित बातम्या