Nagpur Married Couple Suicide : नागपूर एका धक्कादायक घटनेने हादरले आहे. एका जोडप्याला लग्नाला अनेक वर्ष होऊन देखील मूल होत नसल्याने नवरा बायकोने टोकाचं पाऊल उचललं आहे. दोघांनी लग्नाच्या वाढदिवसादिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्या पूर्वी त्यांनी व्हिडिओ देखील काढला आहे. सोमवारी रात्री ही घटना शहरातील जरीपटका भागात मार्टिन नगरमध्ये घडली असून या मुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जेरील उर्फ टोनी ऑस्कर मॉनक्रीप (वय ५४) व ॲनी जेरील मॉनक्रीप (वय ४५) असे आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे. या दोघांच्या लग्नाला २६ वर्ष झाली होती. मात्र, त्यांना मूल नव्हतं. तसेच जरीलची नोकरी गेल्याने तो बेरोजगार होता. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे त्यांनी नैराश्यातून जिवन संपवल्याचे काहींचे म्हणणे आहे.
जेरील व ॲनी या दोघांचा २६ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, त्यांना मूलबाळ नव्हते. यामुळे दोघेही नाराज होते. मुलबाळ होण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र, त्यांना अपत्य प्राप्ती झाली नाही. त्यामुळे त्यांनी सोमवारी रात्री गळफास घेतला. यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ देखील शेअर केला आहे. यात त्यांनी आत्महत्येचे कारण सांगितलं आहे. केले.
जेरील मॉनक्रीप हा शेफ होता. तो एक हॉटेलमध्ये काम करत होता. तर त्याची पत्नी ही घरकाम करायची. मात्र, काही दिवसांपासून ते दोघेही बेरोजगार होते. त्यांनी कर्ज देखील घेतले होते. हे कर्ज कसे फेडायचे याची विवंचना त्यांना होती. त्यात त्यांना मूल नसल्याने ते नैराश्यात होते. या नैराश्यातून त्यांनी जिवन संपवण्याचा निर्णय घेतला. सोमवारी ६ जानेवारी रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यांनी दिवसभर मित्र नातेवाईकांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. मात्र, रात्री त्यांनी गळफास घेत जीवन संपवलं. मंगळवारी सकाळी ११ वाजले तरी त्यांच्या घराचा दरवाजा हा बंद होता. त्यामुळे त्यांच्या शेजऱ्यांनी त्यांना आवाज दिला. मात्र, यातून काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी खिडकीतून पाहिले असतांना दोघांनी गळफास घेतला असल्याचं दिसलं. या घटनेमुळे शेजारी हादरले त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला असून मृतदेह ताब्यात घेतले आहे.
संबंधित बातम्या