Nagpur News: नागपुरातील बोहरा मशीद गल्ली (Bohra Masjid Gali) परिसरातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला. प्रेयसीने (Girl Friend) ब्रेकअप केल्याचा राग डोक्यात ठेऊन तिला धडा शिकवण्यासाठी प्रियकराने (Boy Friend) ती काम करत असलेले दुकानाच पेटवून दिले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र, या आगीत दुकानातील सर्व सामना जळून खाक झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत रमेश चट्टे (वय, १९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बोहरा मशीद गल्ली परिसरात रितेश सुदामा मकीजा यांचे स्टेशनरीचे दुकान आहे. या दुकानात प्रशांतची प्रेयसी नोकरी करायची. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांचा ब्रेकअप झाला होता. यामुळे संतापलेल्या प्रशांतने तिला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने ती नोकरी करत असलेल्या दुकानाला आग लावली.
यानंतर एका व्यक्तीने १ मे रोजी सकाळी रितेशला फोनद्वारे त्याच्या दुकानातून धूर निघत असल्याची माहिती दिली. यानंतर रितेशने ताबडतोब दुकान गाठले आणि याबाबतची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने दुकानाकडे धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत या आगीत सात लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले, असे सांगण्यात येत आहे.
या घटनेमागील सत्य जाणून घेण्यासाठी पोलिसांनी दुकानाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी पहाटे चार वाजताच्या सुमारास अंगावर पांघरलेला एक व्यक्ती दुकानाच्या शटरखाली आग लावताना दिसली. याप्रकरणी पोलिसांनी दुकानातील कर्मचारी आणि परिसरातील लोकांची विचारपूस केली.
त्यावेळी तरुणीने दुकान पेटवून देणारी व्यक्ती प्रशांत असल्याचे सांगितले. या तरुणीची प्रशांतसोबत मैत्री होती. मात्र, तो तरुणीवर संशय घेत असल्याने तिने त्याच्याशी संपर्क तोडला. मात्र, यामुळे प्रशांतच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने तरुणीचे नोकरी घालवण्याचा कट रचला आणि ती काम करत असलेले दुकान पेटवून दिले.
संबंधित बातम्या