Nagpur Murder News: नागपूर येथील पिंपरा गावात सोमवारी जन्मदात्या पित्याने पोटच्या मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. आरोपी वडील फोनवर मोठ्या आवाजात बोलत असताना मृत मुलाने त्याला हळू बोलण्यास सांगितले. या किरकोळ कारणामुळे वडिलांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. यानंतर त्यांनी घरातील लोखंडी रॉडने मुलाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरज काकडे (वय, २८) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. तर, रामराव काकडे असे आरोपी पित्याचे नाव आहे. घटनेच्या दिवशी आरोपी दारू पिऊन आपल्या घरी पोहोचला. त्यावेळी सुरज झोपला होता.घरी गेल्यानंतर रामरावला फोन आला आणि ते समोरच्या व्यक्तीसोबत बोलत होते. रामराव हे फोनवर बोलत असताना मोठ्या आवाजात बोलत होते. त्यांचा आवाज ऐकून सुरजला जाग आली. त्याने रामरावला फोनवर मोठ्याने कशाला बोलता असा प्रश्न केला. यानंतर रामरावला राग अनावर झाला. त्यानी घरातील लोखंडी रॉडने सुरजच्या डोक्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात सुरज गंभीर जखमी झाला. त्यानंतर सुरजला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी रामराव यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. रामरावला न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनवण्यात आली. घटनेच्या दिवशी आरोपी रामरावने मद्यपान केले होते. दारूच्या नशेतच त्याने आपल्या मुलाच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला केल्याची पोलिसांना सांगितले.
संबंधित बातम्या