Nagpur News : नागपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरू असतांना एक धक्कादायक घटना घडली आहे. खटल्यादरम्यान युक्तिवाद सुरू असतांना अचानक वकिलांना हृदयविकाराचा झटका आला. यामुळे ते खाली कोसळले. या दरम्यान, कोर्टात उपस्थित असलेल्या न्यायाधीशांनी याची तातडीने दखल घेत त्यांना दवाखान्यात दाखल केले. मात्र, दवाखाण्यात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
तलत इक्बाल कुरैशी असे कोर्टात हृदय विकराचा झटका येऊन मृत्यू झालेल्या वकिलांचे नाव आहे. कुरैशी हे एका दिवाणी प्रकरणावर जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या एका खटल्या दरम्यान, युक्तिवाद करत होते. यावेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व ते खली कोसळले. यावेळी न्यायाधीश एस. बी. पवार यांनी त्यांना तातडीने एका गाडीने जवळील रुग्णालयात दाखल केले. मात्र, दवाखान्यात उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
तलत इक्बाल कुरैशी शनिवारी सकाळी जिल्हा न्यायालयात एका खटल्या संदर्भात गेले होते. यावेळी ते दिवाणी गुन्ह्या संदर्भात युक्तिवाद करणार होते. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या सातव्या मजल्यावर वरिष्ठ विभागीय दिवाणी न्यायालय असून येथील न्यायाधीश एस. बी. पवार यांच्या न्यायालयात त्यांचा युक्तिवाद सुरू होता. यावेळी त्यांनी त्यांच्या अशिलाची व खटल्याची प्राथमिक उलटतपासणी पूर्ण केली. यानंतर त्यांनी युक्तिवाद करत तयांची बाजू मंडळी. यानंतर ते बेंचवर बसले. दरम्यान, दुसऱ्या पक्षाने युक्तिवाद सुरू केला. यावेळी अचानक कुरैशी यांना हृदयविकाराचा झटका आला व ते अचानक बेंचवरून खाली कोसळले. न्यायाधीश पवार यांनी त्यांना तातडीने दवाखान्यात भरती केले. मात्र, तो पर्यंत उशीर झाला होता.
कुरैशी हे खाली कोसल्ल्यावर त्यांना पाणी पाजण्यात आले. यानंतर न्यायाधीशांनी तलत कुरैशी यांना त्यांच्या खासगी गाडीतून तातडीने दवाखान्यात दाखल केले. मात्र, वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली होती. तलत कुरैशी हे घरी एकटेच राहत होते. त्यांच्या पत्नीचे देखील कोरोनामुळे निधन झाले. त्यांना दोन विवाहित मुली आहेत. कोर्टात झालेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.