Airport Bomb Threat News: नागपूरसह (Nagpur) जयपूर (Jaipur), कानपूर (Kanpur), गोवा (Goa) यासह देशातील अनेक विमानतळांना बॉम्बने उडवून देणारा मेल आला. या धमकीच्या मेलनंतर विमानतळावर मोठा गोंधळ निर्माण झाला. नागपूर विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी १०.०० वाजताच्या सुमारास त्यांना धमकीचा ईमेल आला. विमानतळ संचालक आबिद रुई यांच्या मेल आयडीवर हा ईमेल आला. विमानतळाच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. या धमकीच्या ईमेलची तक्रार विमानतळ प्रशासनाने नागपुरातील सोनेगाव पोलीस ठाण्यात केली. विमानतळाची सुरक्षा वाढवण्यात आली.
हा बनावट ईमेल असल्याचा पोलिसांना संशय असून अधिकाऱ्यांनी सांगितले की, ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे बनावट ईमेल असून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने पाठवण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. दोन दिवसांपूर्वी, कोलकातासह देशातील अनेक विमानतळांवर अशाच प्रकारचे ईमेल आले होते, जे तपासात बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
गोव्याच्या दाबोलीम विमानतळाला त्यांच्या अधिकृत ईमेलवर बॉम्बची धमकी मिळाली. विमानतळ अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर बॉम्बशोधक पथकाने विमानतळाची झडती घेतली. मात्र, काहीही संशयास्पद आढळले नाही. धमकीच्या मेलनंतर विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे, या धमकीच्या मेलचा विमानसेवेवर कोणताही परिणाम झाला नाही.
आज सकाळी राजस्थानच्या जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरही हा ईमेल आला असून शोध मोहिमेनंतर आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नाही. एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'धमकीचे ईमेल पाठवणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या राज्यांतील आमच्या समकक्षांना सहकार्य करत आहोत. पोलिसांचा तांत्रिक विभागही या प्रकरणाचा सक्रियपणे तपास करत आहे.
याआधी शनिवारी (२७ एप्रिल २०२४) मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा अज्ञात फोन आला होता.विमानतळावर काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला शनिवारी विमानतळाच्या गेट नंबर १ (टर्मिनल-१) वर बॉम्ब ठेवल्याचा अज्ञात व्यक्तीचा फोन आला. बॉम्ब शोधक पथकाने तपास केला असता त्यांना विमानतळावर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीविरोधात भादंवि कलम ५०५ (१) (ब), ५०६ (२) आणि ५०७ अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली.
संबंधित बातम्या