Nagpur Hut Fire News: नागपुरात झोपडीला आग लागल्याने दोन सख्या भावडांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत हजारी पहाड सेमिनरी हिल परिसरात काल रात्री १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली असून थंडीपासून वाचण्यासाठी पेटवलेल्या शेकोटीमुळे झोपडीला आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आगीत देवांश रणजित उके (वय, ०७) आणि प्रभास रणजीत उके (वय, ०२) असे आगीत होरपळून मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. सेमिनरी हिल भागात व्हेटर्नरी कॉलेजमागे गोविंद गोरखेडे कॉम्प्लेक्स आहे, त्या समोरच ही झोपडी आहे. थंडीचा कडाका वाढल्याने हात शेकण्यासाठी देवांश, प्रभास आणि त्यांच्या बहिणीने झोपडीत शेकोटी पेटवली. ज्यामुळे झोपडीला आग लागली. ज्यात देवांश आणि प्रभास यांचा होरपळून मृत्यू झाला. सुदैवाने, मोठी मुलगी ओरडत बाहेर आल्याने ती बचावली.
आग लागली तेव्हा मृत मुलांची आई शेजाऱ्यांकडे बसली होती आणि त्यांचे वडील कामाला गेले होते. आगीची माहिती समजताच त्यांच्या आईने आरडाओरडा सुरू केल्याने शेजारचे लोक मदतीसाठी धावले. मात्र, तोपर्यंत आग प्रचंड वाढली. ज्यामुळे ही दुर्घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.