Nagpur, Gadchiroli, Bhandara Earthquake : राज्यात विदर्भात आज सकाळी ७.२७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात हे धक्के बसले. अचानक जमिन हादरल्यामुळे नागरिक घाबरून घराबाहेर पडले. भूकंपाचा केंद्रबिंदू हा गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या तेलंगणातील मूलगु येथे असून याची तीव्रता ५.३ रिश्टर स्केल भूकंपमापकावर नोंदवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात विदर्भात आज सकाळी मोठे भूकंपाचे धक्के बसले. प्रामुख्याने नागपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात हे धक्के बसले. नागरिक सकाळी आपल्या कामाला जात असतांना अचानक ७.२७ च्या सुमारास जमिन हादरली. जमिन शहारल्याची घटना काही ठिकाणी सीसीटीव्हीत देखील कैद झाली आहे. काही काळ हादरे बसल्याने नागरिक भीतीने पळू लागले. काही नागरिक झोपेत होते. त्यांनी देखील घराबाहेर धाव घेतली. भुकंपामुळे घरातील भांडी देखील कोसळली अशी माहिती नागरिकांनी दिली. तेलंगणा आणि छत्तीसगड मध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले असून यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण परसले आहे.
तेलंगणातील मूलगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असून या भूकंपाची तीव्रता ५.३ रिकश्टर स्केल होती. तेलंगणाच्या भद्राचलम शहरात देखील मोठे धक्के बसले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यात या भुकंपामुळे नुकसान किंवा जीवितहानी झाल्याची माहिती नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. राष्ट्रीय भूकंप शास्त्र केंद्र यांच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन याची माहिती घेता येईल, असे देखील सांगण्यात आले आहे. दरम्यान, नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुन्हा धक्के बसल्यास घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या