RSS Chief on OTT Platform : ‘ओटीटी प्लॅटफॉर्मवर जे काही बीभत्स दाखवलं जातं, त्याच्याबद्दल सांगणंही अभद्रपणाचं आहे,’ अशी सांगतानाच, ‘या सगळ्यावर कायदेशीर नियंत्रण आणण्याची गरज आहे,’ अशी अपेक्षा सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज केली.
दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा परंपरागत विजयादशमी मेळावा नागपूरमध्ये पार पडला. या मेळाव्याला मोहन भागवत यांनी संबोधित केलं. राजकीय, सामाजिक बाबींचा उहापोह करताना भागवत यांनी यावेळी माध्यमांमधील कंटेंटवरही भाष्य केलं.
समाजातील मोठे किंवा प्रमुख लोकांचं अनुकरण केलं जातं. मोठे लोक जसं वागतात, चालतात त्याचप्रमाणे इतर लोक चालतात. ते विचार करायच्या भानगडीत पडत नाहीत. प्रभावी लोक जे सांगतात, तसंच इतर लोक करतात. अशा वेळी मोठ्या लोकांची जबाबदारी वाढते. माध्यमांचीही यात महत्त्वाची भूमिका आहे. आपल्याकडून सामाजिक सभ्यतेला धक्का लागेल असं काही त्यांच्याकडून होणं अपेक्षित नाही, असं भागवत म्हणाले.
'ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर जे काही येतं, ते सांगणंही असभ्यपणाचं होईल. अशा बीभत्स गोष्टी तिथं दाखवल्या जातात. यावर कायद्यानं नियंत्रण आणण्याची गरज आहे. खूपच गरज आहे. संस्कार नष्ट होण्याचं एक प्रमुख कारण तेही आहे. मूल्य ऱ्हास झाला तर त्याचा समाजावरही परिणाम होतो, असं भागवत म्हणाले.
'जो महिलांना माता मानतो, तो सुशिक्षित समजला जातो. इतर लोकांच्या धनसंपत्तीचा मोह न ठेवता स्वतःच्या कष्टानं आणि योग्य मार्गानं कमावतो तो सुशिक्षित असतो. इतरांना त्रास होणार नाही, असं माणसाचं आचरण असलं पाहिजे. तसं वागणाऱ्यालाच सुशिक्षित म्हणतात, असं भागवत यावेळी म्हणाले.
'नवीन शैक्षणिक धोरणात अशी मूल्ये असणाऱ्या शिक्षणपद्धतीनुसार अभ्यासक्रम बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु शिक्षकांनी स्वत:च्या जीवनातूनही आदर्श घालून दिले पाहिजेत, नाहीतर शिक्षण परिणामकारक ठरणार नाही. त्यामुळं शिक्षकांच्या प्रशिक्षणाची नवी व्यवस्था करावी लागणार आहे, असंही भागवत म्हणाले.
सोशल मीडिया युजर्सनाही मोहन भागवत यांनी आवाहन केलं. 'सोशल मीडिया वापरणाऱ्यांनी या माध्यमाचा वापर समाजाला जोडण्यासाठी केला पाहिजे. समाजात फूट पाडण्यासाठी किंवा असभ्यता पसरवण्यासाठी याचा वापर होऊ नये. प्रत्येकानं याची काळजी घेणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले.