नागपूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने आपल्या ९ वर्षाच्या चिमुकलीवर अनन्वित अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मुलीला मारहाण करण्याबरोबरच तिच्या अंगावर गरम तवा आणि सिगारेटचे चटके दिल्याच्या खुणा आहेत. ही घटना नागपुरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील अथर्व सोसायटीतील आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. प्रकरण पोलिसांकडे गेल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला आहे.
पोलीस तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. या कुटुंबाने तीन वर्षांपूर्वी पीडित मुलीच्या कुटुंबियांना ५० हजार रुपये देऊन मुलीला घरकामासाठी घरी आणले होते. तेव्हापासून तिचा छळ सुरू होता. तिला घरात कोंडून ठेवले जात होते. कुटूंबाच्या अत्याचाराने मुलगी जोरजोरात ओरडायची.
त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. एक दिवस आरोपी कुटुंब मुलीला घरातच कोंडून बंगळुरूला गेले होते. तेव्हा मुलीचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घराचं कुलूप तोडून पीडितेला बाहेर काढलं आणि याची पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पीडितेच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे. आरोपी कुटुंबाला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. मुलीला तिच्या कुटूंबाकडे सोपवण्यात आले आहे.
संबंधित बातम्या