Nagpur Accident: नागपुरात भरधाव कारची दुचाकीला धडक, ३ जण जागीच ठार; कारचालक फरार!-nagpur chhindwara highway accident speeding car hits bike 3 dead ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur Accident: नागपुरात भरधाव कारची दुचाकीला धडक, ३ जण जागीच ठार; कारचालक फरार!

Nagpur Accident: नागपुरात भरधाव कारची दुचाकीला धडक, ३ जण जागीच ठार; कारचालक फरार!

Sep 30, 2024 02:37 PM IST

Nagpur Chhindwara highway Accident: नागपूर छिंदवाडा महामार्गावर भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

नागपूर: भरधाव कारची दुचाकीला धडक, ३ ठार
नागपूर: भरधाव कारची दुचाकीला धडक, ३ ठार

Nagpur Speeding Car hits Bike: नागपूर येथील केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली. मात्र, या घटनेने परिसरात शोककळा पसरली.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर छिंदवाडा महामार्गावर आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीला धडक दिल्यानंतर कारचालकांनी जखमींना रुग्णालयात दाखल करण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला. या अपघाताची माहिती मिळताच केळवद पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

नागपूर: वर्धा रोडवर भरधाव ट्रकची कंटेनरला धडक

नागपुरातील वर्धा रोडवर भरधाव ट्रकने कंटनेरला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज (३० सप्टेंबर २०२४) पहाटे चार वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. रामलाल गोपीलाल चव्हाण (वय, ५७) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळुंजजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या एसयूव्हीने कारला धडक दिली. या अपघातात एक चिमुकली आणि चिमुकल्यासह चौघांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. गंगापूर तालुक्यातील लिंबे जळगाव टोल नाक्याजवळ शुक्रवारी (१३ सप्टेंबर २०२४) दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली. मृणालिनी अजय बेसरकर (वय, ३८), आशालता पोपलाघाटे (वय, ६५), दुर्गा गित्ते (वय, ७) आणि सहा महिन्याच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला. तर, अजय अंबादास बेसरकर आणि त्याची वहिनी शुभांगिनी सागर गित्ते (वय ३५) हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत हे पुण्यातील शिवणे भागातील रहिवासी असून चिमुकलीचे नामकरण समारंभ आटोपून ते अमरावतीहून खासगी कारने शहरात परतत होते. परंतु, नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर पडली. जवळच असलेल्या एका पेट्रोल पंपावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या अपघाताची घटना कैद झाली.

Whats_app_banner
विभाग