Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis: पुण्यातील पोर्श कार अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताची देशभर चर्चा सुरू असताना नागपूरमधून ड्रंक अँड ड्राईव्हची घटना समोर आली. नागपुरातील कोतवाली पोलीस हद्दीतील झेंडा चौक परिसरात शुक्रवारी सायंकाळी हा अपघात घडला. या अपघातात एका लहान मुलासह तीन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर पोलिसांनी बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या कार चालकासह तिघांना ताब्यात घेतले. यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. तसेच कायदा आणि नियम फक्त सामान्य माणसांना छळण्यासाठी आहेत का? असा प्रश्न राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारला आहे.
या घटनेची माहिती देताना नागपूरचे डीसीपी गोरख भामरे म्हणाले की, "कोतवाली पोलिस स्टेशनच्या झेंडा चौक परिसरात रात्री साडेआठच्या सुमारास एका भरधाव कारने एका लहान मुलासह तिघांना धडक दिली. यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी एका आरोपीला पकडले.प्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे. कारमधून दारूच्या बाटल्या आणि अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे."
"पुणे नंतर काल नागपूर येथे सुद्धा ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण घडले आहे. अपघातातील आरोपींच्या गाडीत दारूच्या बाटल्या आणि अमली पदार्थ असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.राज्यातील मोठ्या शहरांमध्ये ड्रग सहज उपलब्ध होत असल्याबाबत मुद्दा मागील अधिवेशनात आम्ही मांडला होता. वारंवार प्रश्न उपस्थित करून सरकारचे आणि गृह विभागाचे लक्ष याकडे वेधले. त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे आता दिसत आहे", असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
पुढे विजय वडेट्टीवार म्हणाले की, "इतरवेळी ट्रॅफिक पोलिस अलर्ट असतात मग दारू पिऊन , ड्रग सेवन करून गाडी चालवणाऱ्या बेधुंद आरोपींकडे पोलिसांचे लक्ष नाही का? की कायदा आणि नियम फक्त सामान्य माणसांना छळण्यासाठी आहे? मागील २ वर्षात नागपूर क्राईम कॅपिटल म्हणून ओळखली जाते आहे. त्यात असे अपघात होण्याचे प्रमाण वाढल्याने सामान्य नागरिकांच्या जीवाला यामुळे धोका निर्माण झाला आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनांना गांभीर्याने घेऊन कठोर कारवाई करावी ही आमची मागणी आहे."
जखमींमध्ये एक महिला, तीन वर्षांचा बालक आणि अन्य एका व्यक्तीचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेनंतर जमावाने कारची तोडफोड केली.
संबंधित बातम्या