Baba Siddiqui Murder Case : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या दु:खद घटनेनंतर पहिल्यांदाच त्यांचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दीकी यांचे वक्तव्य समोर आले आहे. आमदार झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddiqui) यांनी आज वडिलांच्या हत्येनंतर पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावर पोस्ट लिहीत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचं राजकारण करण्यात येऊ नये, असं आवाहनही झिशान यांनी केलं आहे.
झिशान सिद्दिकी यांनी लिहिलेल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "गरीब निष्पाप लोकांचे आयुष्य आणि घरं वाचवताना माझ्या वडिलांनी आपला जीव गमावला आहे. आज माझे कुटुंब पूर्णपणे कोसळले आहे, मला न्याय हवा आहे, माझ्या कुटुंबाला न्याय हवा आहे. मात्र माझ्या वडिलांच्या मृत्यूचे राजकारण होऊ नये आणि त्यांचे प्राण व्यर्थही जाऊ नयेत," असं आवाहन झिशान सिद्दिकी यांनी केलं आहे.
बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरच्या रात्री निर्मल नगर भागातील आमदार-मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्दिकी यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या, त्यापैकी चार गोळ्या त्यांना लागल्या, तर एक गोळी दुसऱ्या व्यक्तीच्या पायाला लागली. सिद्दीकी यांना तातडीने लीलावती रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हल्ल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन शूटर्सना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक गुरमेल बलजीत सिंग (हरियाणा) आणि दुसरा उत्तर प्रदेशचा धर्मराज कश्यप आहे. तर तिसरा शूटर शिवकुमार गौतम हा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून तो अद्याप फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत असून विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत.
या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला धर्मराज कश्यप याने रविवारी मुंबईतील न्यायालयात आपण १७ वर्षांचे असल्याचा दावा केला. मात्र, आधार कार्डवर त्याचे वय १९ वर्षे नमूद करण्यात आले आहे. या दाव्यानंतर न्यायालयाने कश्यपच्या हाडांची ऑसिफिकेशन चाचणी करण्याचे आदेश दिले. कश्यप अल्पवयीन नसल्याचे सोमवारी चाचणीतून सिद्ध झाले.
दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्यावर शूटर्सनी सहा राऊंड फायर केले, त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्या. गोळीबारानंतर बाबा सिद्दिकी यांनी आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांना म्हटलं होतं की, "मला गोळ्या लागल्या आहेत आणि मला वाटत नाही की, मी वाचू शकेन" हेच त्यांचे शेवटचे शब्द असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे.