Video : महाराज आम्हाला माफ करा… शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर महाविकास आघाडीनं शेअर केला व्हिडिओ, पाहा!-mva shares video and attacks mahayuti and modi govt after shivaji maharaj statue collapsed in sidhudurg ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Video : महाराज आम्हाला माफ करा… शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर महाविकास आघाडीनं शेअर केला व्हिडिओ, पाहा!

Video : महाराज आम्हाला माफ करा… शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर महाविकास आघाडीनं शेअर केला व्हिडिओ, पाहा!

Aug 28, 2024 03:29 PM IST

MVA video after shivaji maharaj statue collapsed : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून राज्य व केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार तोफ डागली आहे.

महाराज आम्हाला माफ करा… शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर मविआनं शेअर केला व्हिडिओ, सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
महाराज आम्हाला माफ करा… शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर मविआनं शेअर केला व्हिडिओ, सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

MVA video after shivaji maharaj statue collapsed : सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. सर्वसामान्य जनता राजकारण्यांना लक्ष्य करत असताना विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीनं या संदर्भात एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. महाराजांची माफी मागत आघाडीनं राज्य व केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली आहे.

मविआनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राजकोट किल्ल्याची दृश्यं आहेत. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवस्था त्यात दाखवण्यात आली आहे. त्याचबरोबर स्वगतही आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनता आपल्या भावना व्यक्त करतेय असं दाखवण्यात आलं आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे फोटो दाखवून त्यांना लक्ष्य करण्यात आलं आहे.

व्हिडिओतील स्वगत जसंच्या तसं…

माफ करा महाराज, माफ करा! तुमच्या पुतळ्याच्या अवस्थेला आम्हीच कारणीभूत आहोत. महाराज आम्ही यांच्या मोठ्यामोठ्या घोषणा आणि आश्वासनांना बळी पडलो. आम्हाला माती आणि सोनं यातला फरकच कळला नाही. महाराज, तुम्ही उभारलेल्या गडकिल्ल्याचा प्रत्येक दगड आजही शाबित आहे. पण भ्रष्ट युतीनं उभारलेला पुतळा आट महिनेही टिकला नाही. महाराज, तुम्ही स्वराज्याचं हित पाहिलंत. रयतेचं हित पाहिलं, पण या भ्रष्ट युतीच्या नेत्यांनी स्वत:चंच भलं केलं. आम्हीच दोषी आहोत. कारण, आम्ही तुमच्या पुतळ्याच्या बाबतीत नेते म्हणून यांच्यावर भरवसा टाकला. पण यांनी कमिशनसाठी लाडगा कॉण्ट्रॅक्टरच गाठला. महाराज, तुमचं नाव घेऊन सत्तेत येणारी लोकं तुमच्यासोबतही नीच वागली. घात झाला महाराज, घात झाला. इथंच आमच्या वेड्या भावनेचा घात झाला. तुमच्या पुतळ्यामध्येही यांनी टक्केवारीचाच डाव केला, अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे.

या पेशव्यांच्या वंशजांनी…

पुतळा निर्मितीला दोन वर्षे लागतात, पण निवडणुकीच्या तोंडावर या पेशव्यांच्या वंशजांनी तीन-चार महिन्यात घाईत पुतळा बनवला. महाराज सिमेंटमध्ये जान असून चालत नाही, काम करणाऱ्यांच्या रक्तात इमान असायला पाहिजे याचा आम्हाला विसर पडला. तुमच्या लोककल्याणकारी विचारांना पायदळी तुडवून यांनी मोठा अपराध केला. निवडणुकीसाठी फक्त तुमच्या नावाचा जयघोष केला. यांना कधीही महाराजांच्या विचारांची, तत्त्वांची आणि कार्याची करदच नव्हती. त्यामुळंच यांनी शिवरायांच्या पुतळ्याची ही अशी अवस्था केली.

तुमची शपथ ह्यांना सोडणार नाही!

ह्यांना फक्त महाराजांच्या नावावर राजकीय पोळी भाजायची आहे, दुसरं काहीही नाही. पण माफ करा महाराज या गद्दारांना ओळखायला आम्ही चुकलो. आम्ही कधीकाळी डोक्यावर घेऊन नाचलो. पण आता तुमची शपथ ह्यांना सोडणार नाही. तुमच्यासोबत गद्दारी करणाऱ्यांचा शेवट करेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.

१ तारखेला मुंबईत मार्च

शिवपुतळा पडल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी येत्या १ सप्टेंबरला महाविकास आघाडीचे नेते मुंबईत आझाद मैदान ते गेट वे ऑफ इंडिया मार्च काढणार आहेत.