मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Graduate Election : सत्यजीत तांबेंना ठाकरेंचा धोबीपछाड; शुभांगी पाटलांना मविआचा पाठिंबा

Nashik Graduate Election : सत्यजीत तांबेंना ठाकरेंचा धोबीपछाड; शुभांगी पाटलांना मविआचा पाठिंबा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 14, 2023 03:08 PM IST

Nashik Graduate Constituency Election : बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांचे वडील सुधीर तांबे यांनी माघार घेतल्यामुळं काँग्रेसची गोची झाली आहे.

Shubhangi Patil vs Satyajeet Tambe In Nashik Graduate Constituency Election
Shubhangi Patil vs Satyajeet Tambe In Nashik Graduate Constituency Election (HT)

Shubhangi Patil vs Satyajeet Tambe In Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत काँग्रेसनं विद्यमान आमदार सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून तांबे यांच्यावर टीका केली जात असतानाच आता महाराष्ट्र शिक्षक सेनेनं तांबेंच्या उमेदवारीचा विरोध केला आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडीनं नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांचा पराभव करण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत मविआच्या नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली असून त्यात नागपूरची जागा काँग्रेसला आणि नाशिकची जागा शिवसेनेला देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. त्यानंतर नाशिकमध्ये शुभांगी पाटील यांना मविआनं पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता सत्यजीत तांबेंच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे. नागपूरमधील शिवसेनेचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकमध्ये काँग्रेसची जागा काढून तिथं शिवसेनेकडून शुभांगी पाटील यांना लढवलं जाणार असल्यामुळं सत्यजीत तांबेंची चांगलीच गोची झाली आहे. त्यामुळं आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आखलेल्या डावपेचांवर भाजपकडून काय उत्तर दिलं जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष...

नाशिक पदवीधर निवडणुकीत सुधीर तांबे यांच्याविरोधात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांना भाजपनं लढवण्याची तयारी केली होती. परंतु सुधीर तांबे यांनी माघार घेऊन सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळं आता भाजप सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेत दिल्यामुळं आता सत्यजीत तांबे हेच भाजपचे उमेदवार असणार असल्याचं बोललं जात आहे.

IPL_Entry_Point