Maharashtra Assembly Budget Session : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारनं महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील मराठी जनतेच्या विकासाठी मंजुर केलेल्या ५४ कोटी रुपयांच्या मदतीला रोखण्याचा निर्णय कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी घेतला आहे. त्याचे पडसाद आज महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत पाहायला मिळाले. कर्नाटक सरकारच्या निर्णयाविरोधात आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृहात शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. त्यानंतर आता विधानपरिषदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं असून यावरून शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कर्नाटक सरकारचा विधानपरिषदेत निषेध केला. त्यानंतर बोलताना ते म्हणाले की, कर्नाटक सरकार मराठी जनतेची मदत थांबवत आहे. मात्र शिंदे-फडणवीस सरकार कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना कोणतंही उत्तर देत नाहीये. अशी कोणती अडचण आहे की ज्यामुळं राज्यातील सरकार कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना उत्तर देत नाहीये?, असा सवाल करत दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. कर्नाटकच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर सभापती निलम गोऱ्हे यांनी सभागृहाचं कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
अजित पवारांचा शिंदे गटावर संताप...
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर बोलताना मंत्री दादा भुसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी संताप व्यक्त केला आहे. मंत्री दादा भुसेंना शरद पवारांचं नाव घेण्याचं कोणतंच कारण नव्हतं. त्यामुळं त्यांनी तातडीनं माफी मागावी नाही तर आम्ही सभागृहातून वॉकआउट करू, अशा इशारा देत अजित पवारांनी शिंदे गटावर संताप व्यक्त केला आहे.
घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा- दानवे
छत्रपती संभाजीनगर शहरात घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणात ईडी चौकशी सुरू झालीय. परंतु घरकुल योजनेतील घोटाळ्यास जबाबदार असणाऱ्यांची चौकशी कधी होणार आहे?, त्यामुळं या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.