होळी म्हणजे रंगोत्सव! वसंत ऋतूचे स्वागत, पीक कापणी हंगामाची लगबग म्हणजे भारतीय परंपरेप्रमाणे सण-सुगीचे दिवस! हा सण भारतीय शास्त्रीय संगीताच्या रंगांत रंगून साजरा करता आला तर बहारच बहार! होळीचा सण फाल्गुनात साजरा होतो. या महिन्याचा महिमा साजरा करण्याच्या निमित्ताने शास्त्रीय संगीताच्या चाहत्यांकरिता फागुनोत्सवाच्या तिसऱ्या आवृत्तीला हजर राहण्याची संधी चालून आली आहे. हर्षोल्हासाच्या वातावरणात रागदारी सांगीतिक मेजवानीचे आयोजन २३ मार्च २०२४ रोजी दुपारी ४.३० ते रात्री १०.३० या वेळेत मुंबईतील दादर येथील वीर सावरकर ऑडिटोरियम येथे करण्यात आले आहे.
भारतीय शास्त्रीय संगीताचे संवर्धन आणि प्रचाराच्या सेवेत असणाऱ्या धानी म्युझिक अँड कल्चरल फाऊंडेशन य संस्थेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात कथ्थक नर्तक पंडित राजेंद्र गंगानी, तबला वादक पंडित कुमार बोस, प्रसिद्ध गायक पंडित रघुनंदन पणशीकर, संतूर वादक पंडित रणजीत पाठक आणि तबला वादक पंडित अजित पाठक यांची कलाप्रस्तुती पाहता येईल. या कलाकारांसोबत विनायक नेटके, संदीप मिश्रा, सिद्धेश बिचोलकर आणि मनोज देसाई साथ-संगत करतील.
या कार्यक्रमाबद्दल बोलताना पंडित बोस म्हणाले, 'हा महोत्सव केवळ भारतीय शास्त्रीय सांगीतिक प्रतिभेचे दर्शन घडवणार नसून आपल्या सांस्कृतिक वारशाच्या चैतन्यमय भावनेला आदरांजली वाहणाऱ्या 'फागुनोत्सव'चा भाग होण्याची संधी मला लाभली, याचा खूप अभिमान वाटतो. या उत्सवाच्या माध्यमातून, प्रेक्षकांना उदात्त सौंदर्य आणि लयबद्ध परमानंद अनुभवता यावा हे आमचे उद्दिष्ट आहे'.
कार्यक्रमाच्या प्रासंगिकतेबद्दल बोलताना पंडित पणशीकर म्हणाले, 'वसंत ऋतू हा केवळ एक ऋतू नाही तर तो नाविन्य आणि पुनरुज्जीवनाचे रूपक आहे. ‘फागुनोत्सव’ या भावनेचे मूर्त स्वरूप असेल. या निमित्ताने कलाकारांसाठी हंगामाचे सार प्रतिध्वनित करणाऱ्या सुरावटी विणण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले. जीवन-संगीताच्या या उत्सवाचा एक भाग असल्याचा रोमांच मला जाणवतो आहे".
संतूर या वाद्यात वसंत ऋतूचे रंग आणि सुगंध जागृत करण्याची अनोखी क्षमता असल्याचे पंडित पाठक यांना वाटते. ते सांगतात, "फागुनोत्सवा’मध्ये, आम्ही या शक्तीचा वापर करून एक भारावणारा संगीत अनुभव निर्माण करण्याचा प्रयत्न करू. हा अनुभव प्रेक्षकांना कल्पनेतील बहरणाऱ्या भूप्रदेशाची सैर घडवेल".
‘जीवनाची लय आणि भाव-भावनेला वाट करून देण्यासाठी’ कथ्थक या माध्यमाचे महत्त्व पंडित गंगानी सांगतात. ते म्हणतात, ‘आपण फागुनोत्सवासाठी एकत्र येत आहोत. जीवनात रमत पुढे चालत जाण्याची वृत्ती आणि मधुरतेचा आनंदाचा घेऊया, हा विपुलता आणि प्रगतीच्या हंगामाचा आरंभ आहे’.
संबंधित बातम्या