Pune Hadapsar hotspot murder : पुण्यात किरकोळ कारणावरून खुनाचे प्रकार वाढले आहे. हडपसर येथे मोबाइल हॉटस्पॉट न दिल्याने चौघांनी रात्री शतपावली करण्यासाठी गेलेल्या एका मॅनेजरची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी कोणतेही धागेदोरे नसतांना चार आरोपींना अटक केली आहे.
वासुदेव रामचंद्र कुलकर्णी (वय ४७, रा. उत्कर्षनगर, हडपसर) असे खून झालेल्यांचे नाव आहे. या प्रकरणी कुलकर्णी यांचे भाऊ विनायक (वय ५२) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर मयूर भोसले (वय २० रा. वेताळबाबा वसाहत , हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. इतर तिघांची नावे समजू शकली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वासुदेव कुलकर्णी हे हडपसर येथील उत्कर्षनगर येथे एका सदनिकेत राहतात. ते एका खासगी बँकेत मॅनेजर आहेत. रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास ते जेवण झाल्यावर फिरण्यासाठी बाहेर पडले. उत्कर्षनगर परिसरातील पदपथावरुन ते जात असतांना पदपथावर असलेल्या अल्पवय मुलांनी त्यांच्याकडे मोबाइलमधील हॉटस्पॉट मागितले. मात्र, कुलकर्णी यांनी हॉटस्पॉट देण्यास नकार दिला. यामुळे तिघांनी कुलकर्णी यांच्याशी वाद घातला. हे तिघेही दारू प्यायले होते. शिवाय त्यांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी प्रवृत्तीची होती. त्यांच्यात झालेल्या वादातून अल्पवयीन मुलांनी कुलकर्णी यांच्यावर कोयत्याने वार केले. यानंतर ते फरार झाले. या हल्ल्यात कुलकर्णी हे गंभीर जखमी झाले. त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले.
या बाबत पोलिसांना देखील माहिती देण्यात आली. कुलकर्णी यांचा दवाखान्यात भरती करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी आरोपींचा शोध घेणीसाठी तपास पथकांची स्थापना केली.
आरोपी ही हडपसर येथील बंटर स्कूल परिसरातील वसाहतीत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानसुयर तीन अल्पवयीन मुलांसह एकाला या प्रकरणी अटक करण्यात आली. त्यांची चौकशी केली असता त्यांनी कुलकर्णी यांनी हॉटस्पॉट दिला नसल्याने किरकोळ वादातून कुलकर्णी यांच्यावर कोयत्याने वार करून खून केल्याची कबुली दिली. आरोपी यांचा कुलकर्णी यांच्याशी काही संबंध नव्हता. कुलकर्णी हे खासगी बँकेत गृहकर्ज मिळवून देत होते. शनिवार पेठेत त्यांच्या बँकेचे कार्यालय आहे.