Munawar Faruqui insults Marathi Manus : बिग बॉस १७ चा विजेता तसेच स्टॅन्ड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. मुंबईत आयोजित एका कॉमेडी कार्यक्रमात कोकणी माणसांबद्दल केलेल्या विधानामुळे तो अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. मुनव्वर फारुकीने आपल्या कार्यक्रमात कोकणी माणसाबद्दल अपशब्दाचा प्रयोग केल्यामुळे तो आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण फारुकीच्या वक्तव्यावर मनसेकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे मनसेनी आक्रमक भूमिका घेत मुनव्वरच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजप नेते नितेश राणे यांनीदेखील मुनव्वर फारुकीवर निशाणा साधला आहे.
मुन्नवरने नेमकं काय म्हटलं?
मुंबईत आयोजित आपल्या एका कार्यक्रमात मुनव्वर लोकांना विचारतो की, तुम्ही सगळे मुंबईचेच आहात ना? की कोणी येथे येण्यासाठी लांबचा प्रवास करुन आलं आहे? त्यावर प्रेक्षकांमधून एकाने उत्तर दिलं की, मी तळोजावरुन आलोय. त्यावर फारुकी म्हणतो आज मी विचारलं तर तळोजा वेगळं झालं आणि जेव्हा यांच्या गावचे लोक विचारतात की, कुठे राहतात,तेव्हा हे लोकं सांगतात की आम्ही मुंबईला राहतो. ही कोकणी माणसं सगळ्यांना चु#$ बनवतात. मुनव्वरच्या या विनोदावर प्रेक्षकांमधूनही टाळ्या पडल्या. फारुकी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तळोजावरून आलेल्या प्रेक्षकाला विचारलं, “तुम्ही कोकणी आहात का?” त्यावर समोरून होकारार्थी उत्तर मिळाल्यावर तो जोरजोराने हसू लागला.
मुनव्वरच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत, शिवसेना शिंदे गटाचे नेते समाधान सरवणकर यांनी मुनव्वर फारुकीवर निशाणा साधला आहे. मुनव्वरला जो तुडवेल त्याला एक लाखाचे बक्षीस,असं त्यांनी म्हटले आहे. मुनव्वरने कोकणी माणसांची माफी मागितली नाही तर या पाकिस्थानप्रेमी मुनव्वरला जिथे दिसेल तिथे त्याला तुडवणार. कोकणी माणूस कसा तुडवतो हे याला समजू दे. याला जो तुडवेल त्याला एक लाखांचे बक्षीस. येवो कोकण आपलंच असा,असे म्हणून स्वागत करणाऱ्या कोकणी माणसांबद्दल हे उपरे ही भाषा बोलतात”, अशा तिखट शब्दांत समाधान सरवणकर यांनी निशाणा साधला आहे. या मुनव्वरला लवकरच मनसेचा दणका बसेल, अशी पोस्ट मनसे वृत्तांत अधिकृतकडून फेसबुकवर करण्यात आली आहे.
दुसरीकडे भाजप नेते नितेश राणे यांनी देखील फारुकीवर निशाणा साधला आहे. “हा कोण मुनव्वर फारुकी नावाचा हिरवा साप, त्याची जीभ चांगलीच वळवळायला लागली आहे. कोकणी माणासाची अशी टिंगल करत असशील तर तुझ्यासारख्या हिरव्या सापांना पाकिस्तानात पाठवायला आम्हाला वेळ लागणार नाही. स्टँडअप कॉमेडीमध्ये कोकणातील लोकांबद्दल टिंगल उडवण्याची जास्तच खाज असेल तर त्याचा घरचा पत्ता आम्हाला चांगल्याप्रकारे माहिती आहे. त्याला लवकरच मालवणी हिस्का दाखवावा लागेल की, तो त्याची स्टँडअप कॉमेडी मालवणीत करायला लागेल.
फारुकीने यापूर्वी अशाच स्टॅन्ड अप कॉमेडी शोमध्ये हिंदू देवतांचा अपमान केला होता. २०२१ मध्ये त्याला याप्रकरणी अटकही झाली होती. हिंदू देवतांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे त्याच्याविरोधात अनेक राज्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.