mumbai underground metro news: कुलाबा-वांद्रे-सीप्झ भुयारी मेट्रो ३ मार्गिका येत्या २४ जुलैपासून मुंबईकरांसाठी खुली करण्यात येणार आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांच्या सुरळीत जनजीवनाची गॅरंटी दिली. ती आता पूर्ण होणार आहे. मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो २४ जुलैपासून सुरू होणार आहे. यामुळे मुंबई शहर आणखी वेगाने धावेल" अशी पोस्ट भाजपाचे राष्ट्रीय प्रभारी विनोद तावडे यांनी एक्स खात्यावरून केली.
एमएमआरसीने ३३.५ किमी लांबीच्या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेचे काम २०१६ पासून हाती घेतले. हे काम २०२१ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा होती. परंतु, तांत्रिक अडचणी, आरे कारशेड वाद, पुनर्वसन यामुळे या कामाला उशीर झाला. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी मुंबईकरांना प्रचंड प्रतिक्षा करावी लागली."मुंबईकरांसाठी आनंददायी बाब, मुंबईची पहिली भुयारी मेट्रो २४ जुलैपासून सुरू होतेय. मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्यात आरे ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यान ही मेट्रो धावेल. मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा आणि प्रवासाचा अविस्मरणीय अनुभवही देईल. या मेट्रोच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांचे जीवन सुसह्य करण्यासाठी दिलेली गॅरेंटी पूर्ण केली आहे. त्याबद्दल मोदीजींचे आभार", अशी पोस्ट भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली.
मुंबईतील भुयारी मेट्रो प्रकल्पांतर्गत ५६ किलोमीटर लांबीच्या २७ ठिकाणांचा समावेश करण्यात येणार आहे. यातील २६ स्थानके भुयारी असतील. कफ परेड, विधानभवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल मेट्रो, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर, सीतालादेवी, धारावी, बीकेसी, विद्यानगरी, सांताक्रूझ, डोमेस्टिक एअरपोर्ट, सहार रोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी, सीप्झ आणि आरे डेपो अशी भुयारी मेट्रोचे स्थानक असतील.
भुयारी मेट्रो सकाळी ६.३० वाजता सुरू होईल आणि रात्री ११.०० वाजेपर्यंत सुरू राहील. ताशी ९० किमी वेगाने धावणाऱ्या गाड्या दर काही मिनिटांनी प्रवाशांना उपलब्ध होतील.
बीकेसीमधील हे स्टेशन भारतातील सर्वात मोठे आणि जगातील सर्वाधिक लांबीच्या स्थानकापैकी एक असेल, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक सुयश त्रिवेदी यांनी दिली. महत्वाचे म्हणजे, बोगद्यातून एकाच वेळी दोन मेट्रो जाऊ शकतात. बीकेसी स्टेशन बनविताना प्रवाशांना जास्त चालावे लागणार नाही. तसेच त्यांना रस्ता ओलांडण्याची गरज भासणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली, असेही त्रिवेदी यांनी सांगितले.
संबंधित बातम्या