Mumbai-Pune Highway Accident News: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बारवई गावाजवळ एका भरधाव बसने महिलेला चिरडल्याची घटना उघडकीस आली. मृत महिला वारकरी असून जवळच्या गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कीर्तन करण्यासाठी गेल्या होत्या. या अपघाताला जबाबदार असलेल्या बसचालकाला पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
यमुना पदू पवार (वय, ७०) असे मृत महिलेचे नाव असून त्या पनवेलमधील मोटे भिंगार गावातील रहिवासी आहे. यमुना या वारकरी असून कीर्तनांना हजेरी लावण्यासाठी त्या वारंवार जवळच्या गावांमध्ये जात असे. दरम्यान, बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास यमुना या त्यांच्या गावातील इतर महिलांसोबत बारवई येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गेल्या होत्या. कीर्तन संपल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास पुन्हा घरी येत होत्या. मात्र, बारवई गावाजवळ मुंबई-पुणे महामार्ग ओलांडत असताना भरधाव बसने त्यांना चिरडले. या घटनेत यमुनाबाई गंभीर जखमी झाल्या. स्थानिक लोकांनी लगेच त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. तसेच बसचालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करून त्यांना अटक केली. संभाजी नागे अटक करण्यात आलेल्या बसचालकाचे नाव आहे. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
संबंधित बातम्या