Mumbai News: मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी ३ तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले. विरारच्या पश्चिममध्ये असणाऱ्या गोकुळ टाऊनशिप येथील पंखा फास्ट या बार अँड रेस्टारंटमध्ये हा प्रकार घडला आहे. या तरुणींचा पोलिसांना अरेरावीची भाषा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही तरुणींना ताब्यात घेऊन पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिमेकडील गोकुळ टाऊनशिपमध्ये पंखा फास्ट नावाचा पब आहे. या पबमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती अर्नाळा सागरी पोलिसांना मिळाली. यानंतर पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तिथे काव्या प्रधान (वय, २२), अश्विनी पाटील (वय, ३१) आणि पूनम यांनी मद्यधुंद अवस्थेत महिला पोलीसांना शिवीगाळ आणि मारहाण केली.
महिला पोलिस कर्मचारी उत्कर्षा वंजारी (वय, २५) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, काव्याने वंजारी यांचा गणवेश फाडून त्यांच्या हाताचा चावा घेतला. तर, अश्विनी पाटील यांनी वंजारी यांचे केस ओढले. तर, पूनम हिने पोलिसांना धक्काबुक्की केली. पोलीस हवालदार मोराळे यांनाही मारहाण करण्यात आली. महिला सुरक्षा रक्षक आकांक्षा भोईर या पबमध्ये त्यांना मदत करण्यासाठी गेल्या असता तिलाही धक्काबुक्की केली. त्यांचा टी-शर्ट फाडण्यात आला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवून या तिघांना ताब्यात घेण्यात आले.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ३ तरुणी पोलिसांची हुज्जत घालताना दिसत आहेत. दारूच्या नशेत त्या पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण देखील करताना दिसत आहेत. याप्रकरणी तिन्ही तरुणींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर तरुणींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. मात्र, या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच संबंधित तरुणींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणींनी जोर धरला आहे.
संबंधित बातम्या