मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  उंदरासाठी ठेवलेला विषारी टोमॅटो खाल्ल्यानं महिलेचा मृत्यू, TVचा नाद जीवावर बेतला

उंदरासाठी ठेवलेला विषारी टोमॅटो खाल्ल्यानं महिलेचा मृत्यू, TVचा नाद जीवावर बेतला

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jul 29, 2022 10:24 AM IST

mumbai woman dies of poison: उंदीर मारण्यासाठी विष घालून ठेवलेला टोमॅटो खाण्यात आल्यानं मुंबईत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Accidental Death
Accidental Death

mumbai woman dies of poison: घरातले उंदीर मारण्यासाठी विषारी औषध घालून ठेवलेले टोमॅटो खाल्ल्यानं एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईतील मालाड भागातील मढ इथं घडली आहे. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

 रेखादेवी फुलकुमार निषाद (३५) असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. रेखादेवी मढच्या पास्कल वाडीत पती आणि दिरासोबत राहत होत्या. निषाद यांच्या घरात उंदीर खूप झाले होते. त्यामुळं त्रस्त झालेल्या रेखा निषाद यांनी उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी विषारी औषध आणले होते. हे औषध त्यांनी टोमॅटोमध्ये मिसळून ठेवलं होतं. त्यानंतर त्या टीव्ही लावून बसल्या होत्या. त्याच वेळी त्यांनी जेवण बनवायला घेतले. टीव्ही पाहण्याच्या नादात टोमॅटोमध्ये उंदरांचं विष घालून ठेवल्याचं त्या विसरून गेल्या आणि तेच टोमॅटो कापून त्यांनी मॅगीमध्ये टाकले. हे सगळं झालं तेव्हा त्यांच्याशिवाय घरात कुणीही नव्हतं. जेवण घेतल्यानंतर त्यांना उलटी आणि जुलाब सुरू झाले. ज्यावेळी त्यांचे पती घरी आले, तेव्हा हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी लगेचच रेखादेवींना शताब्दी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचार सुरू असताना बुधवारी त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

रेखा निषाद यांनी मृत्यूच्या आधी स्वत: पोलिसांना याबाबत माहिती दिली. मृत्यूमागे दुसरं कोणतंही कारण नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

WhatsApp channel