Mumbai Theft News: मुंबईतील दहिसर येथे दिवाळीत घर स्वच्छता करण्याच्या नावाखाली चोरट्यांनी एका ५५ वर्षीय महिलेच्या घरातून चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने पळवले. महिलेने एका मोबाइल अॅपद्वारे स्वच्छता सेवा बूक केली. यानंतर साफसफाईसाठी या महिलेच्या घरी दोन तरुण आले. साफसफाईचे काम करत असताना त्यांनी घरातील दागिने चोरून नेले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
ही घटना ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे सफाई कर्मचारी नेमण्याच्या सुरक्षितता आणि विश्वासार्हतेबद्दल चिंता अधोरेखित करते. पोलिसांनी अरबाज खान (वय, २७) याला अटक केली असून अन्य दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. Viral Video: कुत्र्याला फिरवण्यावरून वाद, दोन तरुणींकडून वृद्धाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल!
मुंबईतील दहिसर येथील ऋषिकेश सोसायटीत राहणाऱ्या लीना म्हात्रे यांनी दिवाळी सणाच्या तयारीसाठी २१ ऑक्टोबर रोजी स्वच्छता सेवा अॅपच्या माध्यमातून दोन कर्मचाऱ्यांना साफसफाईसाठी दोन लोकांना बोलावून घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊच्या सुमारास दोन जण त्यांच्या घरी आले. साफसफाई झाल्यानंतर म्हात्रे यांनी कपाट उघडून पाहिले असता कपाटातील सोन्याचे दागिने गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
सफाई कर्मचारी निघून गेल्यानंतरच चोरी झाल्याचे लक्षात येताच म्हात्रे यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या चोरीतील मुख्य संशयित अरबाज खान (वय, २७) याला अटक केली आहे. सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी संतोष ओमप्रकाश यादव आणि सुफियान नजीर अहमद सौदर या दोघांची ओळख पटवली असून त्यांची सध्या चौकशी सुरू आहे.
'फ्री प्रेस जर्नल'ने दिलेल्या वृत्तानुसार, नोब्रोकर या अॅपने कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी पडताळणी केली होती का? याचा तपास पोलीस करत आहेत. अधिकारी संदीप गोर्डे म्हणाले की, नियमांनुसार सफाई कर्मचाऱ्यांसह सर्व सेवेतील कर्मचाऱ्यांना खासगी निवासस्थानी नियुक्त करण्यापूर्वी त्यांची पोलीस पडताळणी करणे आवश्यक आहे.
नोब्रोकरने या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यापूर्वी त्यांची पडताळणी केली आहे का, याचा आम्ही विचार करत आहोत. या घटनेनंतर अॅपने त्यांचे आयडी ब्लॉक केले आहेत,' असे गोर्डे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले आहे. बहुतेक लोक घराची स्वच्छता करण्यासाठी ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून लोकांना बोलावून घेतात. सर्वच प्लॅटफॉर्म स्वत: ला विश्वासार्ह आणि व्यावसायिक म्हणून प्रोत्साहित करतात. मात्र, तरीही अशाप्रकारचे गुन्हे घडत आहेत.