Western Railway Disrupted: पश्चिम रेल्वे मार्गावरील पालघरमधील वैतरणा स्टेशनजवळील रेल्वे तडा गेल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली. रेल्वे प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या पालघर स्थानकात खोळंबल्या आहेत. तर, लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. सध्या रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम चालू असून चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाला आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास वैतरणा स्टेशनजवळील रेल्वे तडा गेल्याची माहिती प्राप्त झाली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पथके तैनात केली आहेत. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, या दुरुस्तीच्या कामाचा अप-लाइनवरील गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या तात्पुरत्या पालघर तसेच पर्यायी स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत. याशिवाय, लोकल गाड्यांच्या वेळापत्रकही कोडमडले आहे. लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. दुरुस्तीच्या कामामुळे प्रवाशांना निश्चित ठिकाणी पोहण्यासाठी विलंब होण्याची शक्यता आहे.
'पालघरमधील वैतरणा स्टेशनजवळील रेल्वे तडा गेल्याची माहिती प्राप्त झाली. रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरच रेल्वे सेवा सुरळीत होईल. प्रवाशांनी आपल्या आवश्यकतेनुसार पर्यायी प्रवासाची व्यवस्था करावी', असा सल्ला रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तसेच प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली.
माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान पूल पुनर्बांधणीच्या कामासाठी येत्या २४ जानेवारी ते २६ जानेवारीदरम्यान रात्री मोठा ब्लॉक असेल, असे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या ब्लॉकमुळे शुक्रवार/शनिवारच्या रात्री एकूण १२७ उपनगरीय सेवा रद्द केल्या जातील आणि शनिवार/रविवारच्या रात्री सुमारे १५० उपनगरीय सेवा रद्द केल्या जातील. याव्यतिरिक्त, सुमारे ६० उपनगरीय सेवा रद्द केल्या जातील, अशीही माहिती देण्यात आली आहे.
माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान पूल क्रमांक २० च्या शुक्रवार-शनिवार पुनर्बाधणीसाठी आणि शनिवार- रविवारी रात्रकालीन ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. ब्लॉकमुळे शेवटच्या लोकलमधील वेळेत बदल करण्यात आल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. शुक्रवार-शनिवारी अप आणि डाउन धीम्या मार्गावर मध्य रात्री नऊ आणि जलद मार्गावर सात तासांचा ब्लॉक असेल. तर, शनिवार-रविवार मध्यरात्री धीम्या मार्गावर नऊ आणि जलद मार्गावर दहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या