मुंबई : राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली होती. संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने बळीराजा संकटात सापडला होता. मात्र, पावसाने पुनरागमन केले आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात बहुतांश भागात आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. आर्थिक राजधानी मुंबई, ठाणे, पालघर परिसरात झालेल्या पासवामुळे नागरिक सुखावले. आज मुंबईत दहीहंडीचा जल्लोष सुरू असून पावसाच्या आगमनामुळे गोविंदा खुश झाले आहेत. तसेच वाढत्या उकड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना देखील दिलासा मिळाला आहे.
मुंबईत आज सकाळ पासून पावसाने हजेरीलावली आहे. मुंबईच्या सायन आणि दादर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. तर मुंबईच्या अनेक उपगनर भागात देखील पावसाने हजेरी लावली. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. याचा परिणाम वाहतुकीवर झाला. मुंबईत अनेक ठिकाणची वाहतूक ही संथ गतीने पुढे जात होती.
मुंबईसह पालघर आणि ठाणे परिसरातही जोरदार पाऊस झाला. पालघर मध्ये तब्बल १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस झाल्याने येथील शेतकरी खुश झाले आहेत. गेल्या अनेक दिवसापासून राज्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, आज राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे बळीराजा खुश झाला आहे. महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर पाऊस झाल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे. आज राज्यातील नंदुरबार, वाशिम, परभणी, अमरावती, भंडारा या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. नंदुरबार नवापूर तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून पावसानं दांडी मारली होती. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज नवापूर शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस बरसला.
वाशिम जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. तर मारठवड्यातील परभणी शहरात सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
तर विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली असून या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे विदर्भातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विदर्भात पुढील तीन दिवस यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
संबंधित बातम्या