Mumbai Weather Update : मुंबईसह राज्यातील आज १३ मतदार संघात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. मात्र, या मतदार संघात हवामानासंदर्भात मोठी अपडेट आहे. काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागाने सकाळच्या सत्रात मतदान उरकण्याचे आवाहन केले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये आज उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज वातावरणात उष्ण व दमट हवामान राहणार असल्याने नागरिकांचे हाल होणार आहे. दुपारी उन वाढणार असल्याने सकाळच्या सत्रात मतदान उरकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईमध्ये शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणात कडक उन्हाचे चटके आणि प्रचंड उष्मा जाणवला. मुंबईकर गेल्या काही दिवसांपासून या तापमान वाढीने हैराण झाले आहे. रविवार आणि सोमवारी उष्ण, तसेच दमट वातावरण राहणार असल्याने याकहा परिमाण मतदानावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात प्रचंड उकाडा सोसावा लागणार आहे.
राज्यात पाचव्या टप्प्यात केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते पियुष गोयल (मुंबई उत्तर), भारती पवार (दिंडोरी) आणि कपिल पाटील (भिवंडी), शिवसेनेचे श्रीकांत शिंदे (कल्याण), आणि मुंबई काँग्रेसच्या प्रमुख वर्षा गायकवाड आणि भाजपचे उमेदवार आणि वकील उज्ज्वल निकम (मुंबई उत्तर मध्य मतदारसंघ) या फेरीतील आघाडीच्या उमेदवारांपैकी आहेत. याशिवाय धुळे, नाशिक, ठाणे, पालघर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण येथेही मतदान होणार आहे. आज या मतदार संघात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथे तापमान वाढीचा इशारा देण्यात आला आहे. तर नाशिक जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील काही भागात वादळी पाऊस पडत आहे. तर काही भागात उष्णतेच्या लाटेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरांत सोमवारी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे उकाडा कायम आहे. उष्म्यामुळे मुंबईकरांच्या अंगाची लाही लाही होत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी ३५ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, आज देखील तापमान हे वाढलेलेच राहणार आहे.
हवामान विभागाने जालना, बीड, नांदेड, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यांतील काही भागात आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला. सोमवार पासून पुढील चार ते पाच दिवस विदर्भात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर काही भागात ढगाळ वतावरणासह कडक ऊन असेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.