Dusty Storm in Mumbai Thane : मुंबई उपनगर परिसर, नवी मुंबई व ठाणे शहरातील अनेक भागांत आज दुपारच्या सुमारास धुळीचे वादळानं थैमान घातलं. या परिसरात अचानक जोरजोरात वारे वाहू लागले आणि सगळा आसमंत धुळीनं भरून गेला. त्यानंतर काही वेळातच मुसळधार पाऊस सुरू झाला. या वातावरणाचा फटका वाहतूक सेवेलाही बसला.
दुपारी साडेतीन ते पावणेचारच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला. ठाणे आणि नवी मुंबईकडून वाऱ्याचा जोर मुंबईच्या दिशेनं सरकला. नंतर मुलुंड, घाटकोपर असं करत वाऱ्याचा जोर वाढत गेला. वाऱ्याच्या झोतासह धूळ, माती अनेक घरांमध्ये गेली. बैठ्या चाळींवर पावसासाठी घातलेले कागदही उडून गेले. या वाऱ्याच्या पाठोपाठ पावसानंही हजेरी लावली.
वातावरणात अचानक झालेला बदल, सोसाट्याचा वारा आणि त्या पाठोपाठ आलेल्या पावसामुळं मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील नागरिकांची अक्षरश: तारांबळ उडाली. कामानिमित्त बाहेर असलेले लोक वाऱ्याच्या आणि पावसाच्या तडाख्यात सापडले. तर, उकाड्यामुळं घराच्या खिडक्या उघडून बसलेल्या रहिवाशांनाही वाऱ्याच्या माऱ्याचा फटका बसला. या वाऱ्यामुळं घरं धुळीनं माखून गेली. अनेक ठिकाणी वाहतुकीचीही कोंडी झाली. धुळीमुळं समोरचं काही दिसत नसल्यानं गाड्या रस्त्यावर जागीच थबकल्या. नेमकं काय करायचं हेच कुणाला कळत नव्हतं. वाऱ्याचा जोर थांबल्यावर मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
मुंबईच्या जवळपास सर्वच भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. ठाणे आणि नवी मुंबईतही मुसळधार पाऊस सुरू आहे. बराच वेळ पडत असलेल्या पावसामुळं हवेत गारवा निर्माण झाला आहे. उकाड्यानं हैराण झालेले मुंबईकर यामुळं चांगलेच सुखावले आहेत.
वादळ आणि त्या पाठोपाठ आलेल्या मुसळधार पावसामुळं शहरातील अनेक भागातील इंटरनेट सेवेवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी इंटरनेट ठप्प झालं आहे तर काही ठिकाणी इंटरनेट सेवेची गती कमालीची मंदावली आहे.
वाऱ्यानं उडून आलेला एक कपडा मेट्रो मार्गावरील ओवरहेड वायरमध्ये अडकला गेल्यानं घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा काही काळ कोलमडली होती. एअरपोर्ट रोड स्टेशनवर हा प्रकार घडला होता. मात्र, आता मेट्रो सेवा पूर्ववत झाल्याची माहिती मुंबई मेट्रोनं आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर दिली आहे.
प्रादेशिक हवामान केंद्रानं (RMC) ठाणे, पालघर, रायगड, सोलापूर, लातूर, बीड, नागपूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या जिल्ह्यातील काही भागात वादळीवाऱ्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या