उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.संपूर्ण मुंबई शहरामध्ये उद्यापासून (३० मे) ५ टक्के पाणीकपात होणार आहे. तर येत्या ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात (Mumbai Water Cut) लागू होणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात पाणीसाठी कमी झाल्यामुळे पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठ्यामध्ये मोठी घट झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने हानिर्णय घेतला आहे.
मुंबई महानगर पालिकेने पाणीकपात लागू केली असून या निर्णयानुसार मुंबई महानगरात गुरूवार दिनांक ३० मे २०२४ पासून ५ टक्के पाणीकपात, तर बुधवार दिनांक ५ जून २०२४ पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. पाणीकपात लक्षात घेता मुंबईकरांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन केले जात आहे.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार,२०२१ आणि २०२२मध्ये१५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून सक्रीय होता. मात्र २०२३ मध्ये ऑक्टोबर महिन्यात पाऊस झाला नसल्याने यावर्षी धरण साठ्यामध्ये सुमारे ५.६४ टक्के पाणीसाठा कमी आहे. २९ मे २०२४ रोजीची आकडेवारी लक्षात घेता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये मिळून एकूण १ लाख ४० हजार २०२ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटरच्या तुलनेत सध्या फक्त ९.७ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्यावर्षी याच दिवशी १५.१ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता.
मुंबईकरांनी शक्य तितकी पाणीबचत करावी, पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, महानगरपालिका प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा,मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो.
पाणीसाठ्यावर महानगरपालिका प्रशासनाचे अत्यंत बारकाईने लक्ष असून दररोज नियोजनपूर्वक पाणीपुरवठा केला जात आहे. समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार आहे. मुंबईकर नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा,असे आवाहन पालिकेने केले आहे.
संबंधित बातम्या