Mumbai Lakes Water Levels: ऐन पावसाळ्यात मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागत असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाण्याची पातळी ५.३ टक्क्यांवर घसरली आहे. म्हणजेच धरणांमध्ये येत्या ३१ जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. मागील पाच वर्षात पहिल्यांदाच पाण्याची पातळी इतक्या खाली घसरली. गेल्या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे यंदा मुंबईकरांवर पाणीसंकट ओढवले आहे. मुंबईत सध्या १० टक्के पाणीकपात करण्यात आली.
राज्यात काही दिवसांपूर्वीच मान्सून दाखल झाला आहे. मात्र, अद्यापही म्हणावा तसा पाऊस झाला नाही. यामुळे राज्यातील अनेक भागांतील नागरिकांवर पाणीकपातीचे संकट ओढावले आहे. यातच मुंबईकरांचे टेन्शन वाढवणारी माहिती समोर आली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त ५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना पालिकेकडून आवाहन केले जात आहे. महापालिकेने गेल्या महिन्यात ५ टक्के पाणीकपात केली होती. त्यानंतर ५ जूनपासून अतिरिक्त ५ टक्के पाणीकपात करण्यात आली.
दरम्यान, मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावातून पाणीपुरवठा केला जातो. जून महिना संपत आला तरी अजूनही धरण परिसरात पाऊस झाला नाही. यामुळे धरणातील पाण्याची पातळी घसरली आहे. धरण क्षेत्रात जोपर्यंत जोरदार पाऊस होत नाही, तोपर्यंत मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहनही केले आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घसरली आहे. अप्पर वैतरणा आणि भातसा येथून २.२८ लाख दशलक्ष लिटर पाणी वापरू शकतो,ज्यासाठी फेब्रुवारीमध्ये राज्य सरकारकडून मंजुरी घेण्यात आली. मुंबई महानगरपालिका नियमितपणे पाणीपुरवठ्याचा आढावा घेत आहे. वर्षभर पाणीपुरवठा राखण्यासाठी १ ऑक्टोबर रोजी तलावांमध्ये एकूण १४.४७ लाख दशलक्ष लिटरचा पाणीसाठा असणे आवश्यक आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातून दररोज ३ हजार ९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.