Mumbai Water Cut : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे उदंचन केंद्राला सोमवारी आग लागल्यामुळे याचा परिमाण मुंबईच्या पाणी पुरवठ्यावर झाला आहे. अजूनही हा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने पाण्यावाचून मुंबईकरांचे हाल होत आहेत. सोमवारी मध्यरात्रीपासून पालिकेने पाणीपुरवठा बंद केला असून अजूनही हा पाणीपुरवठा बंद आहे. मुंबईच्या काही भागात १०० टक्के पाणी पुरवठा बंद आहे तर काही ठिकाणी कमी दाबानं पाणीपुरवठा सुरू आहे. पाण्याचा काटकसरीनं वापर करावा, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पिसे येथील जल उदंचन केंद्रात संयंत्राला आग लागण्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे मुंबई पूर्व उपनगरांमधील पूर्वेचा भाग तसेच शहर विभागातील गोलंजी, फोसबेरी, रावळी तसेच भंडारवाडा जलाशयांमधून होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. त्यामुळे, या भागांमध्ये पुढील २४ तास पाणीपुरवठा होणार नाही. तसेच याचा परिणाम पश्चिम उपनगर आणि शहर विभागातील इतर भागातील पाणी पुरवठ्याच्या दाबावर काही प्रमाणात पडेल. सबब, संबंधित भागांमधील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेने एक प्रसिद्धी पत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे. सध्या प्लांटच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल असे पालिकेने म्हटले आहे.
मुंबईच्या काही भागात गेल्या २४ तासांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगर आणि शहर विभागातील इतर भागातील पाणी पुरवठ्याच्या दाबावर परिमाण झाला आहे. उर्वरित शहर विभाग पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरमधील पाणीपुरवठ्यात ३० टक्के कपात करण्यात आली आहे.
टी विभाग पूर्व आणि पश्चिम भागात शंभर टक्के पाणीपुरवठा बंद आहे. एस विभाग नाहूर पूर्व, भांडूप पूर्व, विक्रोळी पूर्व या भागातही शंभर टक्के पाणीपुरवठा बंद आहे. एन विभाग विक्रोळ पूर्व, घाटकोपर, पूर्व आणि सर्वोदय नगर, नारायण नगरमध्ये ही पूर्णपणे पाणीपुरवठा बंद आहे. एम पूर्व व एम पश्चिम संपूर्ण विभागतही शंभर टक्के पाणीपुरवठा कालपासून बंद आहे. एफ दक्षिण आणि एफ उत्तर संपूर्ण विभागात तसेस भंडारवाडा जलाशयातू होणारा पाणीपुरवठा ई विभाग बी विभाग, ए विभागात देखील १०० टक्के पाणीपुरवठा बंद आहे.
याशिवाय उर्वरित महानगरपालिकेतील विभाग, पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि शहर विभागात ३० टक्के पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या गैरसोयींबद्दल महानगरपालिकेकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.