मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai water supply : मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी १०.६७ टक्क्यांपर्यंत घसरली

Mumbai water supply : मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी १०.६७ टक्क्यांपर्यंत घसरली

May 23, 2024 09:52 AM IST

Mumbai Water Supply: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील पाण्याच्या पातळीत १० टक्क्यांनी घसरण झाल्याने नागरिकांना पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात येत आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी १०.६७ टक्क्यांपर्यंत घसरली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी १०.६७ टक्क्यांपर्यंत घसरली आहे.

Mumbai Lake Levels Drops: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाण्याची पातळी १०.६७ टक्क्यांपर्यंत घसरली आहे, मागील दोन वर्षांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. राज्य सरकारने भातसा आणि अप्पर वैतरणा तलावातून अतिरिक्त पाणीसाठा दिला असला तरी तलावांची पातळी खालावल्याने नागरी अधिकारी चिंतेत आहेत. मात्र, सद्यस्थितीत पाणीकपातीचे कोणतेही नियोजन नसून परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल, असे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला. नागरी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, "आम्ही भातसा आणि अप्पर वैतरणा तलावांमधून राज्य सरकारने दिलेला २.२८ लाख दशलक्ष लिटर (एमएल) अतिरिक्त साठा वापरू शकतो. बाष्पीभवनातून होणाऱ्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान कसे हाताळायचे आणि कमी करायचे? याचे आमच्यासमोर आव्हान आहे. पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे. यामुळे आम्हाला पाणीकपात करावी लागेल."

मुंबईला दररोज ३ हजार ९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा

महापालिका आयुक्त भूषण गगराणी म्हणाले की, "सध्या मुंबई शहरात पाणीकपात करण्याचा कोणताही विचार नाही. मात्र पुढील आठवड्यात आम्ही आढावा घेऊ." मुंबई महानगरपालिकेने गेल्या वर्षी जुलैमध्ये अतिवृष्टी होईपर्यंत अप्पर वैतरणा तलावातील काही राखीव पाणीसाठा वापरला. तसेच, एका महिन्यासाठी १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती, जी ९ ऑगस्टपर्यंत मागे घेण्यात आली होती. सात तलावातून शहराला दररोज ३ हजार ९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. शहरातील सात तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४.४७ लाख एमएल पाणीसाठा आवश्यक आहे, जो वर्षभर पुरेसा आहे.

मुंबईत दोन दिवस पाणीकपात

बृहन्मुंबई महानगरपालिकेने २१ मे रोजी घाटकोपर, भांडुप आणि मुलुंडसह मुंबईच्या पूर्व उपनगरातील काही भागात २४ तास तात्पुरता पाणीपुरवठा खंडित करण्याची घोषणा केली होती. २४ मे रोजी सकाळी ११.३० ते २५ मे रोजी सकाळी ११.३० वाजेपर्यंत पाणीकपात लागू राहणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग