Lalbaugcha Raja 2024: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काल मुंबईत दाखल झाले. भाजप नेत्यांसोबत बैठक पार पडल्यानंतर आज अमित शाह यांनी आपल्या पत्नीसह मुंबईतील लालबागचा राजाचे दर्शन घेतले. लालबाग राजाचे दर्शन घेण्यापूर्वी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरातील बाप्पाचे दर्शन घेतले. दरवर्षी अमित शहा लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत येतात. यावेळी अमित शहा यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेही उपस्थित होते.
अमित शहा यांचा आज मुंबईतील दुसरा दिवस आहे. रविवारी रात्री त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक घेतली. सोमवारी सकाळी अमित शहा यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील शासकीय निवासस्थानी भेट दिली. यानंतर त्यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले.
महाराष्ट्रात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होऊ शकतात. या निवडणुकीसाठी भाजपसह विरोधीपक्षांनी देखील कंबर कसली आहे. सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला १२३ तर महाविकास आघाडीला १५२ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध शासकीय योजनांबाबत जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ शकतात, असे मानले जात आहे. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात झालेल्या वादग्रस्त विधानांवरही चर्चा झाली. दरम्यान, अमित शहा यांनी भाजप नेत्यांना वाद टाळण्याच्या सूचना दिल्या, अशीही माहिती समोर येत आहे.
गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, ‘आपण सत्तेत असलो तरी संयम बाळगला पाहिजे. एकात्मतेची प्रतिमा जनतेसमोर येईल, याची काळजी घेतली पाहिजे. विजयी क्षमता असलेल्या योग्य उमेदवारांची निवड करावी. विरोधकांच्या फेक नेरेटिव्हला वेळोवेळी उत्तर द्या.’