Mumbai News: मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर अज्ञात व्यक्तीने महाविद्यालयीन तरुणाचे केस कापून पळ काढल्याची संतापजनक घटना सोमवारी घडली. या घटनेने २०१७ च्या चोटी कटवाच्या भीतीच्या आठवणींना उजाळा दिला, ज्याने हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानसह उत्तर भागातील महिलांमध्ये दहशत पसरवली होती. या भागांत महिलांचे केस कापल्याची अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थिनी आहे. पीडिता घटनेच्या दिवशी महिलांसाठी असलेल्या विशेष लोकल ट्रेनमधून कल्याण ते माटुंगा रोड असा प्रवास करत होती. ती सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास दादर स्थानकावर पोहोचली असता पश्चिम रेल्वेच्या फूट ओव्हर ब्रिजजवळ एका अज्ञात व्यक्तीने पाठीमागून येऊन तिचे केस कापले.
पीडिताने गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, दादर रेल्वे स्थानकाच्या बुकिंग काउंटरजवळून जात असताना सकाळी ९.३१ च्या सुमारास तिला काहीतरी टोचल्यासारखे वाटले. तिने मागे वळून पाहिले असता एक अज्ञात व्यक्ती पळून जाताना दिसला. त्यावेळी जमीनीवर केस पडल्याचे तिला दिसले. यानंतर तरुणीने लगेच आपल्या केसांवरून हात फिरवला असता तिचे अर्धे केस कापल्याचे तिच्या लक्षात आले.
यानंतर पीडिताने दादर रेल्वे स्थानकावर असलेल्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्सला या घटनेची मााहिती दिली. त्यांनी पीडिताला घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा आणि एफआयआर दाखल करण्याचा सल्ला दिला. यानंतर लगेच पीडिता मुंबई सेंट्रल जीआरपीकडे गेली, जिथे तिची तक्रार पीएनसी क्रमांक ३/२०२५ U/S १३३ बीएनएस अंतर्गत नोंदवण्यात आली.या घटनेचे गंभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी त्वरीत पुढील तपासाला सुरूवात केली आहे.
उत्तर भारतात २०१७ मध्ये चोटी कटवाच्या अनेक घटना घडल्या होत्या, जिथे महिलांचे केस कापले जात होते. अशा घटनांमुळे परिसरात मोठी दहशत पसरली होती. महिलांना घराबाहेर पडताना भिती वाटत होती. नुकतीच दादर येथे घडलेल्या या घटनेने शहरातील महिलांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे.