Atal setu first accident : १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील शिवडी ते न्हावा शेवा सागरी सेतूचे लोकार्पण केले होते. देशातील सर्वात लांबीचा व सर्वात मोठा सागरी सेतू आहे. या मार्गामुळे मुंबई ते नवी मुंबईतील अंतर केवळ २ तासांवर आले आहे. उद्घाटनानंतर नवव्याच दिवशी या मार्गावर अपघात झाला आहे. रविवारी दुपारच्या सुमारास एक कार अपघातग्रस्त झाली. दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
भरधाव कार मार्गातील दुभाजकावर आदळल्याने हा अपघात झाला. या कारमधून पाच जण प्रवास करत होते. ही धडक इतकी भीषण होती की, कारचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. आज रविवार असल्याने सागरी सेतूवर वाहनांची वर्दळ अधिक होती. त्या अपघातग्रस्त वाहनाचा चालत रॅश ड्रायव्हिंग करत असल्याचे समोर आले आहे. पुढच्या वाहनाला ओव्हरटेक करताना हा अपघात झाला.
अपघातानंतर काय घडलं आहे, हे पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र अपघातग्रस्त कार मार्गातून तत्काळ बाजुला केल्याने काही मिनिटात वाहतूक सुरळीत करण्यात आली.
अटल सेतूवर प्रवास करताना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी उद्घाटनाच्या पहिल्या चार दिवसातच तब्बल १२२ वाहनचालकांना दंड ठोठावण्यात आला आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत अटल सेतू पूलावर वाहने थांबवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १४ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २८ हजारांचा दंड वसूल केला आहे. तर न्हावाशेवा वाहतूक पोलिसांनी ११८ लोकांवर कारवाई करत १.३१ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
अटल सेतू महामार्गावर वाहतुकीच्या नियंमाचे उल्लंघन होऊ नये यासाठी अटल सेतूवर रात्रंदिवस वाहतूक पोलीस कार्यरत असतात.