पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर चौथ्या दिवशीत वाहनचालकांना दंडात्मक कारवाईचा दणका बसला आहे. अटल सेतूवरून प्रवास करताना अनेक प्रवासी रस्त्यात वाहने थांबवून सेल्फी आणि फोटो काढताना दिसत आहेत. अशा वाहनचालकांचे चालान कापले जात आहेत.
यातच परवानगी नसतानाही अटल सेतू पूलावरून प्रवास केल्याबद्दल ऑटोरिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वाहतूक पोलिसांनी ऑटोचालकाविरुद्ध 'रॅश ड्रायव्हिंग' आणि 'इतरांचा जीव धोक्यात घालणे' या आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर १२२ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल १२२ वाहनचालकांना दंड ठोठावण्यात आला आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत अटल सेतू पूलावर वाहने थांबवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १४ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २८ हजारांचा दंड वसूल केला आहे. तर न्हावाशेवा वाहतूक पोलिसांनी ११८ लोकांवर कारवाई करत १.३१ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
अटल सेतू महामार्गावर वाहतुकीच्या नियंमाचे उल्लंघन होऊ नये यासाठी अटल सेतूवर रात्रंदिवस वाहतूक पोलीस कार्यरत असतात. त्यांच्यासाठी एखादी जागा मिळावी, अशा आशयाचे पत्र न्हावाशेवा वाहतूक पोलिसांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला लिहले आहे.