Mumbai Local News: हार्बर मार्गावरील मानखुर्द आणि वाशी रेल्वे स्थानकात विद्युत तार तुटल्याने मुंबई लोकल सेवा विस्कळीत झाली. परिणामी, वडाळा-वाशी दरम्यान डाऊन सेवा बंद झाली असून प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, प्रवाशांना ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आल्याचे रेल्वेने सांगितले.
मानखुर्द आणि वाशी रेल्वे स्थानकांदरम्यान ओव्हरहेड इक्विपमेंट तुटल्यामुळे मुंबईतील हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली. या कालावधीत प्रवाशांना समान तिकिटे आणि पास वापरून ट्रान्सहार्बर मार्गावर प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. तसेच प्रवाशांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल मध्ये रेल्वेने दिलगिरी व्यक्त केली. ओव्हरहेड विद्युत तार दुरुस्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास ओव्हरहेड विद्युत तार तुटली. यामुळे पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. लोकल १५ ते २० मिनिटापासून स्थानकावर थांबल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, वाशी, कुर्ला या रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तर, अनेक प्रवाशी हे जीव मुठीत घेऊन रेल्वे ट्रॅकवरुन चालत प्रवास करत आहेत.
याआधी ८ ऑगस्ट २०२४ रोजी कल्याण कसारा मार्गावरील आसनगाव ते आडगाव दरम्यान रुळांवर मोठा दगड पडल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी ढिगारा हटवून रेल्वे सेवा पूर्ववत केली. या घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अपलाइन सेवेतील गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. यामध्ये साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, ११०७२ बलिया-एलटीटी कामायनी एक्स्प्रेस, १२१०८ सीतापूर-एलटीटी एक्स्प्रेसचा समावेश आहे.