विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस व महाविकास आघाडी ६ नोव्हेंबर रोजी प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रचारसभा होणार आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजता मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलातील MMRDA मैदानात मविआची ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा’ होणार असून या सभेत विधानसभा निवडणुकासाठी काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी जाहीर करणार आहेत, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे
महाविकास आघाडीच्या वतीने एमएमआरडीए मैदान, बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स, बांद्रा पुर्व मुंबई या ठिकाणी जाहिर सभा घेण्यात येणार आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर राहणार आहेत. त्यामुळे बीकेसी मधील एमएमआरडीए मैदान परिसरात लोकांची मोठया प्रमाणात गर्दी होवून त्याचा परिणाम वाहतूकीवर होणार असल्याने, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काही मार्ग वाहतूकीसाठी बंद करून, त्या मार्गावरील वाहतूक ठराविक कालावधीकरिता इतरत्र वळविण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात अधिसुचना काढण्यात आले आहे.