Mumbai Traffic News: अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मुंबईच्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर परिसरात आज (२५ जून २०२४) भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. भाविकांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीसारखी समस्या निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक मार्गांमध्ये बदल केले आहेत. त्याबाबत मुंबई वाहतूक पोलिसांनी निर्बंध जारी केले आहेत.
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. परिणामी, एस वीर सावरकर रोड, एस के बोले रोड, गोखले रोड दक्षिण आणि उत्तर, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सयानी रोड, आप्पासाहेब मराठे मार्गावर वाहतुकीसंबंधित समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आज सकाळी ६:०० ते मध्यरात्री १२:०० या वेळेत अनेक भागांत वाहतूक निर्बंध तात्पुरते लागू करण्यात आले आहेत.
१) एसके बोले रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.
२) गोखले रोडपासून दत्ता राहुल रोड आणि एन एम काळे रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश नसेल.
३) आगर बाजार जंक्शनपासून एस के बोले रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी.
४) एस के बोले रोडवर फक्त सिद्धिविनायक जंक्शनपासूनच प्रवेश देण्यात येईल.
५) लेनिनग्राड जंक्शनपासून शंकर घाणेकर रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश नाही.
सर्व देवी-देवतांमध्ये श्रीगणेशाला पहिले पुजले जाते. श्रीगणेशाच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही, असे म्हणतात. श्रीगणेशाच्या आशीर्वादाने भक्तांवरील सर्व संकटे दूर होतात. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची खऱ्या मनाने पूजा केल्यास भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख, संकटे दूर होतात. याशिवाय, कीर्ती, धन, वैभव आणि उत्तम आरोग्य प्राप्त होते, असेही मानले जाते.
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी. या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करून श्रीगणेशाची पूजा करावी. पूजा करताना तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. श्रीगणेशाची मूर्ती फुलांनी सजवा. पूजेमध्ये तीळ, गूळ, लाडू आणि फुले गोळा करा. तांब्याच्या कलशात पाणी, उदबत्ती, चंदन आणि केळी किंवा नारळ ठेवा. त्यानंतर श्रीगणेशाला फुले आणि पाणी अर्पण करा. त्यानंतर श्रीगणेशासमोर तिळाचे लाडू आणि मोदक ठेवावेत. करावेत.