अंधेरीतील गोखले पूल हा पुनर्बांधणीसाठी बंद केला जाणार आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोणारा हा पूल ७ नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिलीय. याबाबतचे आदेश काही दिवसांपूर्वी जारी केले आहेत. महापालिका आणि मुंबई पोलिसांकडून या पुलाची पाहणीसुद्धा करण्यात आली होती. अंधेरीतील प्रमुख आणि सर्वाधिक वाहतूक असलेल्या मार्गांपैकी एक असा हा पूल आहे.
गोखले पूल किमान दोन वर्षांसाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेकडून नियुक्त केलेल्या सल्लागार कंपनीने गोखले पूल हा असुरक्षित असल्याचं सांगितलं होतं. तसंच तो बंद करण्याची सूचना दिली होती.
पूल बंद केल्यानंतर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनासह वाहतूक पोलिसांकडून ६ पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये खार सबवे (खार) मिलन सबवे उड्डाणपूल ( सांताक्रूझ), कॅप्टन गोरे उड्डाणपूल (विलेपार्ले उड्डाणपूल), विलेपार्ले, अंधेरी सबवे (अंधेरी), बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल (जोगेश्वरी), मृणालताई गोरे उड्डाणपूल (गोरेगाव)
दरम्यान, पर्यायी मार्गांबाबत वाहनचालकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. वाहतूक कोंडीत पर्यायी मार्गांमुळे भरच पडेल असं मत वाहनचालकांकडून व्यक्त केलं जात आहे. अंधेरी सबवे मार्ग हा गोखले पुलाइतकी वाहतूक पेलण्यास सक्षम नाही. तसंच विलेपार्ले स्थानकाजवळचा उड्डाणपूल लहान आहे. तसंच पुढे हा मार्ग अरुंद गल्ल्यांमधून जातो. इथून वाहतूक वळवली तर यामुळे आणखी मोठी वाहतूक कोंडी होईल अशी शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
गोखले पूलाचा एक भाग जुलै २०१८ मध्ये कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. तसंच पश्चिम रेल्वेवरील वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेकडून शहरातील पुलांच्या सुरक्षिततेसाठी ऑडिट करण्यात आले. आयआयटी-मुंबईकडून शहरातील पुलांचे ऑडिट केले गेले. याच पुलाचा एक भाग कोसळल्यानतंर गोखले रोड पूल अंशत: खुला केला होता. मात्र पूर्ण क्षमतेने वाहतूक होत नसल्याने वाहतूक कोंडी होत होती.
संबंधित बातम्या