Mumbai Scam News: मुंबईतील टोरेस घोटाळ्याचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु करण्यात आला आहे. टोरेसची सर्व कार्यालयं सील करण्यात आली आहेत. तर, टोरेसची तीन बँक खाती देखील गोठवण्यात आली आहेत. मात्र, या तपासादरम्यान अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. टोरेसने डायमंडच्या नावाखाली मोइसॅनाइटच्या खड्यांची विक्री करून आपल्या गुंतवणूकदारांची फसवणूक केली. भारतीय बाजारात या खड्यांची किंमत ३०० रुपये असून ती गुंतवणूकदारांना ४२ ते ५० हजार रुपयांना विकले गेले, अशी माहिती ईओडब्ल्यूचे डीसीपी संग्राम सिंह निशाणदार यांनी सांगितले.
याप्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या उझबेक नागरिक तानियाच्या घरातून ७७ लाख रुपये रोख जप्त केले. दुकानातून सुमारे १००० दगड जप्त करण्यात आले आहेत, जे हिरे असल्याचे सांगून गुंतवणूकदारांना फसवण्यासाठी वापरले जात होते. त्या दगडासोबत एक प्रमाणपत्र देण्यात आले, ज्यामुळे लोकांना तो खरा हिरा असल्याचा विश्वास बसला. हिरे खरेदी केलेल्या ग्राहकांना सांगण्यात आले की, त्यांना दर आठवड्याला इन्सेन्टिव्ह दिले जाईल. ग्राहकांना खरेदीवर १० ते १५ टक्के परतावा मिळेल. तसेच हिरे खरेदी केलेल्या लोकांनी एखादा ग्राहक आणला तर, त्यालाही इन्सेन्टिव्ह दिले जाईल, असे टोरेसने आपल्या गुंतवणूकदारांना सांगितले, अशीही माहिती चौकशीत समोर आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जानेवारी रोजी दादरमधील टोरेस शोरूममध्ये एका कॉन्फरन्स मीटिंग दरम्यान, कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यात जोरदार वाद झाला. त्यानतंर काही कर्मचाऱ्यांना पगाराची चिंता व्यक्त करत शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कर्मचाऱ्यानंतर काही गुंतवणूकदारांनीही पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर हा वाद वाढत गेला आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला.
पोलिसांनी आतापर्यंत ३ आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये उझबेकिस्तानची नागरिक तानिया जसातोवा (वय, ५२), रशियन नागरिक व्हॅलेंटिना गणेशकुमार (वय, ४४) आणि उमरखेडी येथील रहिवासी सर्वेश सुर्वे यांचा समावेश आहे. कंपनीचे सीईओ तौफिक रियाझ उर्फ जॉन कार्टर, ओलेना स्टोनी आणि व्हिक्टोरिया फरार आहेत.
या प्रकरणात पोलिसांचा निष्काळजीपणाही समोर आला आहे. टोरेसचे अकाउंटंट अभिषेक गुप्ता यांनी डिसेंबरमध्ये पोलिसांना जवळजवळ १०० पानांचा ईमेल पाठवला होता, ज्यामध्ये अनेक लोकांच्या पळून जाण्याबद्दल माहिती होती. बनावट दगड विकण्याची पद्धत समजावून सांगण्यात आली, पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे.