Mumbai News: अटल सेतूवरून उडी मारून एका ३५ वर्षीय बँकेत नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याने सोमवारी आत्महत्या केल्याची घटना घडली. मयत व्यक्तीवर कामाचा ताण होता. मात्र, कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याचे त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारी महिन्यात उद्घाटन करण्यात आलेला हा पूल लोकांसाठी सुसाइड पॉईंट बनत आहे. या पुलाचे उद्घाटन झाल्यापासून या पुलावरून अनेकांनी समुद्रात उडी घेत आत्महत्या केली आहे. यातील एका जणाला वाचवण्यात वाहतूक पोलिसांना यश आले आहे.
दरम्यान, देशातील सर्वात लांब पूल अटल सेतू जानेवारी महिन्यापासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सुरुवातीला हा पूल प्रवाशांसाठी पर्यटनस्थळ बनले आहे. मात्र, मागील आठ महिन्यात या पुलावरून चार जणांनी समुद्रात उडी घेतली. यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, टॅक्सी चालक आणि वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका महिलेला जीव वाचला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मृतांमध्ये उच्च शिक्षितांचा समावेश आहे.
सर्वात प्रथम एका डॉक्टर महिलेने १८ मार्च २०२४ रोजी समुद्रात उडी घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर २५ जुलै २०२४ रोजी एका अभियंत्याने आत्महत्या केली. तर, २ सप्टेंबर २०२४ रोजी एका तरुणाने समुद्रात उडी घेतली. काही दिवसांपूर्वीच एका महिलेने अटल सेतूवरून समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. टॅक्सी चालक आणि न्हावा-शेवा ट्रॅफिक पोलिसांनी मोठ्या साहसाने महिलेचा जीव वाचवला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
अटल सेतू पूल २२ किलोमीटरचा आहे, त्यातील १६.८० किलोमीटर रस्ता समुद्रातून आहे. हा भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्री पुल असून जगात हा १२ व्या स्थानी आहे. या अटल सेतुवरून कार, टॅक्सी, कमी वजनाची वाहने, मिनी बस, टू एक्सल बस, लहान ट्रकला परवानगी आहे. तर, दुचाकी, ऑटो रिक्षा, टॅक्टर , मोपेड, तीन चाकी टेम्पो, बैलगाडी अथवा घोडागाडी, मुंबईकडे जाणारी मल्टी एक्सल जड वाहने, ट्रक आणि बसला अशा वाहनांना परवानगी नाही. अटल सेतू महामार्गाची रचना ताशी १०० किमी वेगमर्यादेनुसार करण्यात आली. याआधी महामार्गावरून ताशी ८० किमी वेगमर्यादा ठेवण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला होता.