Mumba Rape News: मुंबईत २० वर्षीय तरुणीला भेटायला बोलवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोचालकाला अटक केली. आरोपी असद शेख हा साकीनाका येथील राहिवाशी असून त्याची घाटकोपर येथे राहणाऱ्या पीडितेशी काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती, अशीही माहिती समोर आली आहे.
सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर दोघांनी कमानी येथील एका मॉलजवळ भेटायचे ठरवले. त्यांची भेट झाली असता शेख यांनी तिचा फोन घेतला, तो परत देण्यास नकार दिला. तसेच तिला टेम्पोमध्ये बसण्याचा आग्रह धरला. त्यानंतर त्याने टेम्पो जरीमारी येथील एका निर्जन स्थळी नेला आणि तरुणीवर बलात्कार केला. तरुणीने विरोध केला असता त्याने तिचे डोके लोखंडी सळ्यांवर आपटले, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.
पीडितेला रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्याने तिला भाभा रुग्णालयात नेले. उपचारानंतर ही तरुणी फोन न घेता पळून जाण्यात यशस्वी झाली. तिने या घटनेची माहिती तिच्या पालकांना दिली नाही. त्यानंतर आरोपीतिच्या परिसरात आला आणि तिने या घटनेबद्दल कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्याशी संबंध ठेवण्यास भाग पाडले.
दरम्यान, २७ जून रोजी ही महिला घाटकोपर येथे खरेदी करत असताना आरोपीने तिचा फोन परत करण्याचे आमिष दाखवून तिच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्याने तिला पुन्हा आपल्या टेम्पोत बसवले. त्याने तिला विरारजवळ कुठेतरी नेले आणि पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. त्याच दिवशी उशीरापर्यंत महिला घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. ५ जुलै रोजी पीडित मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर तिच्या पालकांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फिर्याद दिली. घाटकोपर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून हे प्रकरण पुढील तपासासाठी साकीनाका पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.
साकीनाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गबाजी चिमाटे यांनी सांगितले की, हे प्रकरण आमच्याकडे हस्तांतरित झाल्यानंतर आम्ही ९ जुलै रोजी आरोपीला अटक केली असून आम्ही या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहोत. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५ (२), ३५१ (३), ६४, ६४ (२) (डी) आणि ७४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
संबंधित बातम्या