Mumbai News: मुंबईतून एक धक्कादायक घडली आहे. ताडदेव परिसरात राहणाऱ्या एका १० वर्षीय मुलीवर तिच्या इमारतीतील लिफ्टमनने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ताडदेव परिसरातील एका इमारतीच्या डी विंगमध्ये राहते. गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास पीडिता दुसऱ्या विंगमध्ये जात असताना लिफ्टमनने तिला स्पर्श केला आणि तिचे चुंबन घेतले. यामुळे पीडित मुलगी घाबरली आणि सध्याकाळी तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आई- वडिलांना सांगितला.
हे ऐकताच आई- वडिलांच्या तळपायची आग मस्तकात गेली. त्यांनी संबंधित लिफ्टमनला चांगला चोप दिला आणि त्यानंतर त्याची स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत आरोपीला ताब्यात घेतले. लल्लो पासवान असे आरोपी लिफ्टमनचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
आरोपीवर या आधी कोणाताही गुन्हा नाही. पासवानला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, पुढील चौकशीसाठी त्याला पोलीस कोठडी सुनावली. त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३५४ कोणत्याही महिलेवर प्राणघातक हल्ला किंवा फौजदारी बळजबरी) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याच्या तरतुदी ८ (लैंगिक हल्ला) आणि १२ लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.