Mumbai, Tansa River : सध्या आषाढ महिना सुरू असून या महिन्यात गटारी साजरी करण्यासाठी अनेक जण नॉनव्हेज पार्ट्यांचे आयोजन करत आहेत. अशीच एक पार्टी काही तरुणांनी तानसा धरणाच्या पायथ्याशी सुरू केली होती. मात्र, अचानक पाणी वाढल्याने पार्टी करणारे तरुण गडीसह नदीत वाहून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यातील तिघांनी गाडीच्या बाहेर उडी मारल्याने ते बचावले. तर दोघे जण आतमध्ये राहिल्याने ते वाहून गेले. यातील एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा शोध घेण्याचे कार्य सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणपत चिमाजी शेलकंदे असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यात कल्याण-मुंबई वरून गटारी साजरी करण्यासाठी काही तरुण हे धरणाजवळ गेले होते. हे सर्व जण तानसा धरणाच्या गेट नंबर एकच्या खाली शनिवारी दुपारी गाडीत बसून पार्टी करत होते. यावेळी अचानक तानसा धरणाचे स्वयंचलित २४ दरवाजे उघडण्यात आले. धरणातून अचानक मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने हे पाचही जण गाडीसह नदीच्या प्रवाहात वाहून गेले. पाणी वाढले असल्याचे समजताच गाडीतील इतर तिघांनी उड्या मारून ते बाहेर पडले. मात्र, दोघांना गाडीच्या बाहेर पडता आले नाही.
या घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळाली. त्यांनी तातडीने बचाव व शोध कार्य राबावण्यास सुरूवात केली. शोध कार्यात बेपत्ता झालेल्या एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. मृत तरुणाचे नाव गणपत चिमाजी शेलकंदे असून तो मूळचा कल्याण येथील रहिवासी आहे, दुसऱ्या बेपत्ता तरुणाचा शोध सुरू आहे.
उजनी धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून उजनी धरण जलाशय ८६ टक्के क्षमतेने भरले आहे. त्यामुळे पुरनियंत्रणासाठी उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीपात्रामध्ये आज सायंकाळी ५ वाजता २० हजार क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे. भीमा नदी काठच्या नागरीकांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदी मधील शेती पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.