Mumbai Nagpada Police Suicide: मु्ंबई नागपाडा पोलीस रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून एका ३९ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने शनिवारी (१३ जानेवारी) आत्महत्या केली. मयत पोलीस कर्मचाऱ्याची अलीकडेच माहिम पोलीस ठाण्यातून सशस्त्र (एलए) पोलीस- ३ मध्ये बदली झाली होती. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी आत्महत्येची नोंद करीत पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कैलास गवळी (वय, ३९) असे आत्महत्या केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. गवळी हे शुक्रवारी एलए वरळी येथील कार्यालयात ड्युटीसाठी गेले होते. तिथे त्यांना ड्युटीवर रुजू होण्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट मागितले. त्यासाठी गवळी नागपाडा पोलीस रुग्णालयात गेले. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना दाखल करून घेतले. मात्र, रविवारी सकाळी उठल्यानंतर गवळी यांनी रुग्णालयाच्या बाथरूममध्ये गेले आणि खिडकीतून उडी मारली.
या घटनेत गवळी यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. उपस्थित डॉक्टर आणि पोलिसांनी गवळी यांना रुग्णवाहिकेतून सर जेजे रुग्णालयात नेले. मात्र, उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी एडीआर दाखल करून पत्नीचा जबाब नोंदवला.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गवळी माहीममध्ये तैनात असताना ८९ दिवस गैरहजर होते. तिथून त्यांची बदली झाल्यावर ते एलएला गेले. मृतदेहाजवळ पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. यामुळे गवळी यांनी आत्महत्या का केली, यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मुंबईच्या कांदिवली परिसरात सोमवारी एका महिलेने इमारतीच्या ९व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. मंगला प्रवीण राठोड (वय, ६०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मंगला या आपल्या कुटुंबांसोबत राहत होत्या. याप्रकरणी समता नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत. याप्रकरणी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. मंगला राठोड यांच्या पश्चात पती, तीन मुले आणि सून असा परिवार आहे.