Mumbai Mira-Bhayanadar News: मुंबईतील मीरा-भाईंदरमधील घोडबंदर किल्ल्याजवळ सोमवारी धक्कादायक घटना घडली. सायकल स्टंट अपघातात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
नीरज यादव (वय, १६) असे सायकल स्टंट अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून तो मीरा रोड येथील रहिवाशी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नीरज हा सोमवारी सायकलने किल्ल्यावर गेला होता. परंतु, किल्ल्याच्या उतारावरून उतरत असताना नीरजचे नियंत्रण सुटल्याने त्याची सायकल जोरात भिंतीला धडकली. सायकल भिंतीला धडकताच नीरज खाली पडला आणि जमिनीवर निपचित पडला. घटनास्थळी तिथे उपस्थित असलेले लोक त्याच्या मदतीसाठी धावून गेले. त्यानंतर लगेच त्यांनी नीरजला बाबासाहेब आंबेडकर शासकीय रुग्णालयात नेले.मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही संपूर्ण घटना जवळच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नवी मुंबईतील उलवे येथील एका जनरल स्टोअर आणि एका घराला लागलेल्या भीषण आगीत एक महिला आणि दोन मुलांसह एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली.तर एक जण जखमी झाला आहे. रमेश असे जखमी झालेल्या दुकानदाराचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर त्याची पत्नी आणि दोन मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (एसीपी) यांनी सांगितले की, आम्हाला ३० ऑक्टोबर रोजी आठ वाजताच्या सुमारास एका व्यक्तीच्या घर आणि किराणा स्टोअरला आग लागल्याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. किराणा दुकानात तीन गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दुकान आणि निवासस्थानाला आग लागल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले. पाच किलोचे दोन छोटे सिलिंडर आणि एक १२ किलोचा सिलिंडर फुटला.
रमेश मूळचा राजस्थानचा असून तो आपल्या कुटुंबासह मुंबईत राहत होता. जखमींवर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्य अग्निशमन अधिकारी विजय राणे यांनी ही माहिती देताना सांगितले की, आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि आग आटोक्यात आणली. त्यानंतर त्वरीत जखमींना स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केले आहे. गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.