सेंट्रल रेल्वे प्रशासनाने मुंबईतील सायन रेल्वे ओव्हर ब्रीज (sion railway overbridge) पाडण्याचा निर्णय घेतला आहे. ११२ वर्षे जुना असलेला व मुंबई पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा आणि वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ऐतिहासिक पूल जमीनदोस्त होणार आहे. सायन पुर्व-पश्चिम परिसराला जोडणारा सायन ओव्हर ब्रीज हा मध्य रेल्वे प्राधिकरणाकडून तोडून नवीन बांधण्यात येणार आहे. यामुळे मुंबईत ट्रॅफिक एडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. या मार्गदर्शक सूचना १ ऑगस्ट २०२४ पासून लागू होतील. याबाबत अधिकृत पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
सायन उड्डाण पूल ब्रिटिशकाळात म्हणजे १९१२ मध्ये बांधण्यात आला आहे. हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT)ने आपल्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये म्हटले होते. त्यानंतर हा पूल पाडण्याच्या हालचालींना वेग आला होता. फेब्रुवारीमध्ये हा पूल पाडला जाणार होता, मात्र दहावी-बारावीच्या परीक्षा असल्याने ही तारीख पुढे ढकलली होती.
१ ऑगस्ट २०२४ ते ३१ जुलै २०२६ पर्यंत २ वर्षे सायन पूर्व-पश्चिम परिसराला जोडणारा सायन ओव्हर ब्रिज हा मध्य रेल्वे प्राधिकरणाकडून तोडून नवीन बांधण्यात येणार आहे. यामुळे माटुंगा वाहतूक विभागातून बि.ए. रोडवरून सायन ओव्हर ब्रिज (प) वाहिनीमार्गे एल.बि.एस रोड, संत रोहिदास रोडकडे जाणारी वाहतूक, कुर्ला वाहतूक विभागातून एल. बी. एस. रोड मार्गे जाणारी वाहतूक ही तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहे. संत रोहिदास रोडवरून सायन ओव्हर ब्रिज पूर्व वाहिनीवरून बी.ए. रोड मार्गे जाणारी वाहतूक ही तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहे. या मार्गांवरील वाहतूक इतर मार्गाने वळवून पुढीलप्रमाणे वाहतूक व्यवस्थापन करण्यात आलेले आहे. कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
१- सायन जंक्शनवरून बीए रोडच्या बाह्य वळणावरून सायन सर्कलकडे वळावे लागणार आहे. तसेच सुलोचना शेट्टी रोड आणि कुंभारवाडा जंक्शन मार्गे आपल्या गंतव्य स्थानाकडे जावे लागणार आहे.
२. सायन जंक्शनवरून डॉ. बीए रोडच्या उत्तरेकडे जाणारी वाहतूक सायन रुग्णालय जंक्शनजवळ डावीकडे वळून सुलोचना शेट्टी रोड आणि कुभारवाडा जंक्शन मार्गे पुढे जावे लागेल.
३. कुर्ला ते एलबीएस रोड आणि संत रोहिदास रोडने येणारी हलकी वाहने पैलवान नरेश माने चौकातून उडवीकडे वळवावीत. पुन्हा संत रोहिदास रोड, अशोक मिल नाका मार्गे ९० फूट रोड-कुंभारवाडा जंक्शनच्या उजवीकडे सुलोचना शेट्टी रोड-कुंभालवाडा ब्रिजच्या पुढे आपल्या मार्गाने जावे लागणार आहे.
४. कुर्ला ते एलबीएस रोड आणि संत रोहिदास मार्गाने अवजड वाहने पैलवान नरेश माने चौकाच्या आधी धारावी कचरापट्टी जंक्शन सिग्नलच्या उडवीकडे वळवावी लागतील. पुन्हा धारावी डिपो रोड, सायन बांद्रा लिंक रोड, टी जंक्शन, माहिम सायन लिंक रोड, खेमकर चौकातून डावीकडे वळून ६० फुटी रोड, सुलोचना शेट्टी रोड-धारावी रेल ब्रिज मार्गे आपल्या गंतव्याकडे जावे लागेल.
५. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि कलानगर जंक्शन मार्ग सायन बांद्रा लिंक रोड कडे जाणाऱ्या वाहनांना धारावी टी जंक्शनजवळ उजवीकडे वळावे लागणार आहे. त्यानंतर खेमकर चौकातून डावीकडे वळावे लागणार आहे. त्यानंतर ६० फुटी रोज आणि कुंभारवाडा जंक्शन मार्गे आपल्या गंतव्य मार्गाकडे जावे लागेल.
संबंधित बातम्या